

नाशिकरोड : कोविडनंतर पंचवटी एक्स्प्रेसच्या रेकचा मुंबई-हिंगोली जनशताब्दी होत असलेला वापर थांबवून नाशिकसाठी पूर्वीप्रमाणे स्वतंत्र पंचवटी एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणी प्रवासी वेल्फेअर असोसिएशनने केली आहे. हिंगोली जनशताब्दीला उशिराचा फटका पंचवटी एक्स्प्रेसला बसत असून, तीही उशिरा धावत असल्याने चाकरमान्यांना घरी पोहोचण्यास विलंब होत आहे.
नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसातही पंचवटी एक्स्प्रेस वेळेत मुंबईला पोहोचली होती. त्यामुळे रोजच्या प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र, मंगळवारी (दि. ७) मुंबई-हिंगोली जनशताब्दी उशिराने आल्याचा परिणाम पंचवटी एक्स्प्रेसवर झाला. गाडी मुंबईहून सुमारे सव्वा तास उशिरा सुटल्याने ती नाशिकला मध्यरात्रीच्या सुमारास पोहोचली.
प्रवासी संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविडपूर्वी पंचवटीसाठी स्वतंत्र रेक उपलब्ध होते. मात्र, कोविडनंतर त्याच रेकचा वापर हिंगोली-मुंबई जनशताब्दीसाठी केला जात असल्याने त्या गाडीला होणारा विलंब पंचवटीच्या वेळापत्रकावर परिणाम करतो. त्यामुळे नाशिक-मुंबई दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रवासी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश फोकणे, उपाध्यक्ष किरण बोरसे तसेच संदीप शिंदे, कैलास बर्वे, दीपक कोरगावकर, रतन गाढवे आणि उज्ज्वला कोल्हे यांनी पंचवटीसाठी स्वतंत्र रेक उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच सध्याच्या एलएचबी डब्यांऐवजी पूर्वीप्रमाणे आरामदायी डब्यांची पंचवटी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करावी, अशीही मागणी केली आहे.
८० हजार प्रवाशांना सहा कोटी परत
दरम्यान, सहा जुलै रोजी कर्जत-लोणावळादरम्यान दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक गाड्या रद्द किंवा मार्ग बदलून चालविण्यात आल्या. या व्यत्ययामुळे प्रवास करू न शकलेल्या ७९, हजार ७४७ प्रवाशांना ५.९१ कोटी रुपयांचा परतावा वितरित केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.