

नाशिक : खासदार संजय राऊत यांना गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर कुठे दिसत आहेत ? त्यांनीच ते शोधून द्यावेत. स्वतः काही करायचे नाही आणि काहीही बोंब ठोकतात. त्यांच्या मागे आता कोणी उरलेले नाही. पंतप्रधानांपासून ते सरन्यायाधीश, निवडणूक आयोग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वाटेल ते बोलणे, हा एकच गुणधर्म त्यांच्याकडे उरला आहे, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली. राऊत यांच्या जिभेला हाड नाही, हा त्यांचा 'मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट' आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
भाजपचे संकटमोचक मंत्री महाजन यांनी रविवारी (दि. १२) नाशिक येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. कुंभमेळ्याची सर्व कामे ही गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरला दिल्याच्या राऊत यांच्या आरोपांवर बोलताना मंत्री महाजन म्हणाले की, राऊत यांच्या आरोपांना फार उत्तर देण्याची गरज नाही. पूर्वी 'हम दो, हमारे दो' चालत होते, पण आता ठाकरे गटात 'उद्धवजी, आदित्यजी आणि त्यांचे हे एक अपत्य (संजय राऊत)' एवढेच उरले आहेत, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
नाशिकमधील नगरसेवकांच्या संभाव्य फुटीवर मंत्री महाजन म्हणाले की, मला याची पूर्ण कल्पना नाही, पण सध्या ठाकरे गटाकडे शिल्लक तरी कोण राहिले आहे, त्यांची महापालिका नाही, १७ पैकी एकही आमदार नाशिकमध्ये निवडून आला नाही, नगरपालिका त्यांच्याकडे नाही. भविष्यात त्यांचे काहीच दिसत नाही. त्यांचे भविष्य आता २ ते ५ टक्केही उरलेले नाही. त्यांनी स्वतःचा पक्ष बुडवला, हेच त्यांच्यासाठी काफी आहे, असे सांगत त्यांनी ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
त्या हॉटलाइनबाबत न बोललेले बरे
एकनाथ खडसे यांनी केलेल्या दाव्यांवर मंत्री महाजन म्हणाले की, मी कधीच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नव्हतो. खडसेसाहेब पूर्वी शर्यतीत होते आणि ते स्वतः तसे म्हणायचे. मी कधीही असा दावा केला नाही. तसेच, खडसेंना अमित शाह यांचा फोन आल्याच्या मुद्द्यावर त्यांची दिल्लीसोबत डायरेक्ट 'हॉटलाइन' आहे, असे ते स्वतःच म्हणायचे. आम्ही छोटे लोक आहोत, त्यामुळे त्या हॉटलाइनबाबत आम्ही न बोललेलेच बरे असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
आमदार बच्चू कडू हे महायुतीचे मोठे नेते आहेत. ते रोज काही ना काही बोलत असतात, त्यांना काही तरी झाले असेल. हे काही असे लोक आहेत की त्यांच्याबद्दल न बोललेलेच बरे, असे म्हणत मंत्री महाजन यांनी त्यावर अधिक बोलणे टाळले.