

नाशिक : डॉ. राहुल रनाळकर
नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या नऊ महिन्यांत तब्बल ४६ खुनांच्या घटना घडल्या. गुन्हेगारी टोळ्यांचा वावर, राजकीय आश्रय, समाजमाध्यमांवरील दहशत दाखविणारे रिल्स या सर्वांनी शहराची शांतता ढवळून निघाली होती. मात्र, आता पोलिसांनी ‘झिरो टॉलरन्स’ मोहिमेच्या माध्यमातून गुन्हेगारीच्या अड्ड्यांवर घणाघात सुरू केला आहे. दुसरीकडे गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना गजाआड करणे सुरु केले आहे. त्यामुळे नाशिक पुन्हा एकदा कायद्याचा बालेकिल्ला बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
खुनांच्या घटनांनी हादरलेले शहर
नाशिक शहरात ९ महिन्यांत ४६ खून ! आकडा मोठा असला तरी त्यातील बहुतांश घटना या टोळीयुद्ध, वैयक्तिक आकस किंवा वर्चस्वाच्या संघर्षातून घडलेल्या आहेत. सर्वसामान्य नागरिक बळी पडलेल्या घटनांची संख्या चार आहे. म्हणजेच, ‘गुन्हेगार विरुद्ध गुन्हेगार’ असेच चित्र अधिक दिसते. तथापि, हा प्रकार शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या यंत्रणेसाठी धोक्याची घंटा होती. गुन्हेगार टोळ्यांवर काही ठिकाणी राजकीय कृपा असल्याच्या चर्चांनी पोलिसांची जबाबदारी अधिक वाढवली होती.
अवैध धंद्यांचा सुळसुळाट
अवैध दारू, मटका, जुगार, वेश्याव्यवसाय आणि अंमली पदार्थ या धंद्यांनी शहराच्या काही भागांना वेढले होते. या माध्यमातून गुन्हेगारी टोळ्यांचे ‘नेटवर्क’ फोफावत गेले. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ‘झिरो टॉलरन्स’ मोहिम सुरू करताच अनेक नामचीन गुंडांना अटक झाली. त्यांच्या मालमत्तांवर कारवाई झाली. गुन्हेगारीला मिळणारे ‘ग्लॅमर’ आणि ‘स्टेटस’ हे समाजमाध्यमांतून पसरलेले विष संपवण्यासाठीही ठोस मोहीम सुरू झाली आहे.
अल्पवयीन मुलांचा गैरवापर : धोक्याची घंटा
अनेक प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलांना गुन्ह्यात ओढले जात असल्याचे लक्षात आले. टोळ्यांमध्ये प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात तरुण गुन्ह्यांकडे ओढले जात होते. पोलिसांनी या प्रवृत्तीवर लगाम घालण्यासाठी ‘युवा संवाद’, ‘सायबर अवेअरनेस कॅम्पेन’ आणि ‘मुलगी सुरक्षित- समाज सुरक्षित’ असे सामाजिक उपक्रम सुरू केले. पालक आणि शिक्षकांनी या प्रयत्नांना साथ दिल्यास गुन्हेगारीकडे झुकणाऱ्या तरुणांना योग्य दिशादर्शन होईल.
राजकीय आश्रय आणि कायद्याची परीक्षा
गुन्हेगारीचा पाया राजकीय आश्रयावर उभा राहतो, ही गोष्ट सर्वपरिचित आहे. काही स्थानिक नेते गुन्हेगारांना ‘आपला माणूस’ म्हणून वागवताना दिसले. काहींना तर पक्षात स्थानही मिळाले. अशा परिस्थितीत पोलिसांना निष्पक्षपणे कारवाई करणे हे मोठे आव्हान होते. संदीप कर्णिक यांनी राजकीय दबावाला न जुमानता केलेल्या कारवायांनी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. गुंडांच्या फलकबाजीवर बंदी, मोक्का अंतर्गत गुन्हे, सततचे राउंडअप्स या वेगात होत असलेल्या कारवाईमुळे गुंडांना जरब बसली.
‘झिरो टॉलरन्स’ : गुन्हेगारीला थेट आव्हान
‘गुन्ह्याला शून्य सहिष्णुता’ या धोरणावर आधारित मोहिम हे नाशिक पोलिसांचे सर्वात मोठे शस्त्र ठरले. प्रत्येक विभागात गुप्तचर पथके सक्रिय झाली, सीसीटीव्ही नेटवर्क वाढवले, रात्रीच्या वेळी गस्त वाढवली. संभाव्य गुन्हेगारांना ‘बाऊंड ओव्हर’ नोटिसा देऊन सावध केले. या मोहिमेतून अनेक टोळ्या उध्वस्त झाल्या आणि अल्पावधीत शहरातील गुन्हेगारी दरात घट दिसू लागली आहे.
सोशल मीडियावरील ‘दहशतीचा शो’ संपला
गुन्हेगारांनी बनवलेले रिल्स, तलवारी, बंदुका दाखवणारे व्हिडिओ आणि धमकीचे पोस्ट्स या माध्यमांतून गुन्हेगारीचे ग्लॅमर वाढत होते. पोलिसांनी अशा प्रकरणांत थेट अटक केली आणि स्पष्ट संदेश दिला : ‘नाशिकमध्ये गुन्ह्याचे सेलिब्रेशन नाही.’ या मोहिमेने तरुणांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचवला आहे. समाजमाध्यमांचा वापर आता पोलिस जनजागृतीसाठीही केला जातो आहे.
सुरक्षित नाशिककडे वाटचाल
ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थी वर्गाच्या सुरक्षेला पोलिस प्राधान्य देत आहेत.
महिला बीट अधिकारी योजना
ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन
विद्यार्थी पोलिस कॅडेट योजना
या उपक्रमांद्वारे नागरिक आणि पोलिस यांच्यातील दुवा अधिक मजबूत झाला आहे.
‘आपले पोलीस- आपला मित्र’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरू लागली आहे.
निवडणुकीपूर्वीची सावधगिरी :
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरु होत आहे. या काळात गुंडशाही पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी विशेष नियंत्रण ठेवले आहे. दारू, पैसा आणि दहशतीच्या माध्यमातून मतप्रभाव टाळण्यासाठी स्वतंत्र गुप्तचर पथके सक्रिय झाली आहेत.
गुन्हेगारीवर अंकुश ठेवणे ही केवळ पोलिसांची नाही, तर प्रत्येक राजकीय पक्षाची नैतिक जबाबदारी आहे. तीन सत्ताधारी पक्ष आणि तीन विरोधी पक्ष या सगळ्याचा दरम्यानच्या काळात पोलिसांवर दबाव असल्याचे समोर येत होते. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हा सगळा दबाव झुगारुन गुंडगिरीविरुद्ध कारवाई केल्याने सामान्य नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे.
नागरिकांचा सहभाग, यशाचे खरे शस्त्र
गुन्हेगारीविरुद्ध पोलिसांचे प्रयत्न तेव्हाच यशस्वी ठरतात जेव्हा नागरिकही त्यात सहभागी होतात. आपल्या भागात काय घडते, कोण संशयास्पद वावरतो, कोण समाजमाध्यमांवर हिंसाचाराला उत्तेजन देतो हे नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. शहरातील युवकांना रोजगार, क्रीडा आणि सर्जनशीलतेकडे वळविणे ही दीर्घकालीन गुंतवणूक ठरू शकते.
कायद्याचा बालेकिल्ला बनण्याची नवी उमेद :
नाशिक हे संत परंपरेचे, औद्योगिक प्रगतीचे आणि सांस्कृतिक, धार्मिक समृद्धीचे शहर आहे. गुन्हेगारीच्या सावटातून बाहेर येत असलेले हे शहर आज पुन्हा ‘कायद्याचा बालेकिल्ला’ बनण्याच्या दिशेने ठाम पावले टाकत आहे. संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांची ठोस कृती, नागरिकांचा सहभाग आणि राजकीय इच्छाशक्ती या त्रिसूत्रीमुळे नाशिकमध्ये सुरक्षिततेचा आणि विश्वासाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. कायद्याचा सन्मान करणारे नाशिक हेच खरे आधुनिक, समृद्ध आणि शांत नाशिक ठरेल आणि तो दिवस दूर नाही.