

नाशिक : पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली गुन्हेगारीविरोधातील मोहीम आजही तीव्रतेने सुरू असल्याचे दिसून आले आहे. सिडको परिसरातील भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि मयूर शेवाळे यांच्यासह गुन्हेगारीशी संबधितीत दोन वकिलांचीही गुन्हे शाखा युनिट १ कडून ४ तास चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान गोपनियता ही पाळण्यात आली. याचबरोबर ७ जणांची गुन्हे शाखेत विशिष्ट पद्धतीने आणि कसून चौकशी करण्यात आली.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ‘गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडायचं नाही’ हे ठाम धोरण स्वीकारल्यामुळे ही कारवाई अधिक तीव्र झाली आहे. नाशिक शहरातील गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सिडको परिसरातील गुन्हेगारी कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे आता आयुक्तांनी थेट सिडकोकडे लक्ष घातले असून, त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांची चौकशी करण्यात आली. मात्र, ही चौकशी नेमक्या कोणत्या प्रकरणात झाली, याचा तपशील अधिकृतपणे समजू शकलेला नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच ‘मीच पोलिस आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत.’ असे स्पष्ट केले आहे. यामुळे पोलिस विभागाचा आत्मविश्वास वाढला असून, मोहिम अधिक जोमाने राबवली जात आहे. या कारवाईमुळे संपूर्ण शहरात आणि विशेषतः राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे भाजपमधील काही नगरसेवक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ज्यांच्यावर थेट आरोप नसले, पण गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींशी जवळचा संबंध आहे, असे लोकही आता पोलिसांच्या रडारवर असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
नाशिक शहरात शांतता आणि कायदा- सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तींचा बंदोबस्त सुरू आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करणे आहे. कोणी स्वतःला भाई, बॉस, सरकार म्हणून ओळख करून देत असेल आणि सोशल मीडियावर रिल्सद्वारे दहशत पसरवत असेल, तर नागरिकांनी थेट आमच्याकडे तक्रार करावी. आम्ही कठोरात कठोर कारवाई करू.
संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक