नाशिक : एक वर्षापूर्वी स्थापन झालेल्या अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने राज्यभरात प्रभावी कारवाई करत वर्षभरात ६७.६९ कोटी रुपयांचे अमली पदार्थ व मुद्देमाल जप्त केला आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दल अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद, विशेष पोलिस महानिरीक्षक शारदा राऊत, उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील व अपर पोलिस अधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
शासनाच्या ३१ ऑगस्ट २०२३ च्या निर्णयानुसार टास्क फोर्स स्थापन करण्यात आला. अमली पदार्थांची विक्री, पुरवठा व वितरण रोखणे, जनजागृती आणि व्यसनाधीन व्यक्तींचे पुनर्वसन करणे हे या टास्क फोर्सचे उद्दिष्ट आहे. १५ मे २०२५ पासून कार्यरत असलेल्या या टास्क फोर्समध्ये २२७ अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून, राज्यभर सात युनिट्स स्थापन करण्यात आले आहेत. वाशी पोलिस ठाणे, नवी मुंबई येथे उपअधीक्षक रामचंद्र मोहिते, निरीक्षक नितीन बोधे, संतोष गावशेते, सहायक पोलिस निरीक्षक उदय काळे, माधवानंद धोत्रे, उमेश भोसले, उपनिरीक्षक सुहास भोसले, संजय अदलिंग व त्यांच्या पथकाने अब्दुल कादर रशीद शेख यास अटक करत मोठा मुद्देमाल जप्त केला. या तपासात प्रशांत पाटील यास कोल्हापूर, मलखान रामलाल बिष्णोई व सूरज रमेश यादवला बंगळुरूमधून अटक करण्यात आली.
शिरपूर तालुक्यात उपअधीक्षक गुलाबराव पाटील, पोलिस निरीक्षक प्रकाश पवार, सहायक पोलिस निरीक्षक भागवत व्यवहारे, माधवानंद धोत्रे, उपनिरीक्षक संजय अदलिंग यांनी २०५० किलो गांजा जप्त करत सात आरोपींना अटक केली. नागपूरमध्ये सहायक पोलिस निरीक्षक अमोल कोळेकर, शिवाजी टिपुणे यांनी संजय यादव यास अटक करत ५०७ किलो गांजा जप्त केला.
माहिती देण्याचे आवाहन
अमली पदार्थाबाबत कोणाकडे काही माहिती असल्यास अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स पुणे (७२१८००००७३ यावर संपर्क करून माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.