

दिंडोरी (नाशिक) : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी धरणसाठ्यात झालेली मोठी वाढ ही निश्चितच दिलासादायक बाब ठरत आहे. अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मात्र, या निसर्गरूपी वरदानामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे चेहरे खुलले आहेत.
पश्चिम भागातील डोंगरदऱ्यांतून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आल्याने करंजवण, वाघाड, ओझरखेड, पालखेड, तिसगाव व पुणेगाव या प्रमुख धरणांच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. तालुक्यातील सर्वात मोठे आणि येवला, निफाड, नांदगाव तालुक्यांसह दिंडोरी परिसराच्या पिण्याच्या व शेतीच्या गरजांसाठी महत्त्वाचे मानले जाणारे करंजवण धरण ३०.६७ टक्के भरले आहे. वाघाड धरण, जे अनेक पाणीवापर संस्थांसाठी रक्तवाहिनी मानले जाते, त्याचा साठा ४०.४७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
शहर आणि चांदवड तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या ओझरखेड धरणात ३५.३० टक्के, तर पूर्व दिंडोरीसाठी अत्यंत महत्त्वाचे तिसगाव धरण १८ टक्के भरले असून, पावसामुळे कोरडे असलेले धरण आता पुन्हा शेतकऱ्यांना आशा देत आहे.
नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी मांजरपाडा (देवसाणे) वळण प्रकल्पातून अद्याप पाण्याचा प्रवाह सुरू नसला तरी पुणेगाव धरणाचा साठा ३८.५१ टक्क्यांवर पोहोचला आहे. एकदा वळण प्रकल्पाचा प्रवाह सुरू झाल्यास, ओझरखेड आणि तिसगावसारख्या धरणांना मोठा लाभ होणार आहे.
तालुक्याचे प्रमुख पालखेड धरण ८० टक्के भरले होते. पावसाचा जोर लक्षात घेता कादवा नदीपात्रात टप्प्याटप्प्याने ४,००० क्यूसेकने पाणी सोडण्यात आले होते. सध्या या धरणाचा साठा ५६.६६ % वर स्थिरावला आहे. एकूणच, तालुक्यातील प्रमुख धरणांमधील जलसाठा समाधानकारक असून, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मिळालेला हा जलसाठा आगामी शेती हंगामासाठी फायदेशीर ठरणार आहे. संततधार पावसामुळे उद्भवलेल्या अडचणी असूनही, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती नक्कीच आश्वासक मानली जात आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पेरणीला विलंब होत आहे. शेतीकामाचा वेग मंदवला आहे. मे महिन्यापासून पाऊस पडत असल्यामुळे शेती मशागतील वेळ मिळत नसल्यामुळे सोयाबीन, मका, भुईमूग, उडीद, मूग या पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. खरीप हंगामातील भाजीपाला लागवडीवर परिणाम झाला असून, तालुक्यात भाजीपाला लागवडीस प्रारंभ झालेला नाही. बळीराजा पाऊस उघडण्याची प्रतीक्षा करताना दिसत आहे.