नाशिक : सायबर क्राइम दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भामट्यांकडून नवनवीन फंडे वापरले जात आहेत. असाच एक प्रकार उघडकीस आला असून फसवणुकीची रक्कम बँक खात्यात आणण्यासाठी भामट्यांनी बँक खात्यात चालू खाते उघडून तसेच त्या खात्यांना वेगवेगळ्या व्यक्तींची सीमकार्ड लिंक करून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार केले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील एका सरकारी बँकेच्या व्यवस्थापकाने भामट्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. भामट्यांनी २३ एप्रिल ते ६ ऑगस्ट या कालावधीत इंटरनेट, फोनचा वापर करून तसेच प्रत्यक्ष भेट देऊन बँकेत चालू खाते उघडले. त्यासाठी भामट्यांनी बनावट कागदपत्रे सादर केलीत. मात्र त्यांनी सादर केलेले व्यवसाय अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. तसेच नव्याने सुरू केलेल्या बँक खात्यास वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे घेतलेले मोबाइल क्रमांक जोडल्याचेही निदर्शनास आले. दरम्यान, या चालू खात्यांमधून अल्पावधीतच कोट्यवधी रुपयांचे बँक व्यवहार झालेत. याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी या बँक खात्यांचा तपशिल तपासला. सखोल तपासात या बँक खात्यांमधून दोन कोटी रुपयांपर्यंतचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे बँक खाते उघडणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस तपास करीत आहेत.
शेअर मार्केटमधून कमी कालावधीत जादा परतावा, कुरीअरमध्ये अंमली पदार्थ असल्याचे सांगत सीबीआय, ईडी कारवाईचा धाक दाखवणे किंवा इतर प्रकारे ऑनलाइनरित्या नागरिकांची फसवणूक केल्यानंतर भामटे या बँक खात्यांमध्ये नागरिकांकडील पैसे घेत असल्याचे उघड झाले.
याआधी सायबर पोलिसांच्या तपासात बनावट युपीआय ॲड्रेस वापरून किंवा सर्वसामान्य नागरिकांना विशिष्ट रकमेचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती भाडेतत्वावर घेऊन भामटे फसवणुकीची रक्कम त्या खात्यात घेत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर आता भामट्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाती उघडून आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आले आहे.