Crime Case | बलात्कार आणि मानसिकता !

बलात्कार कुठल्यातरी एका कारणाने होत नाही
Crime Case
Crime CaseOnline Pudhari
Published on
Updated on

डॉ. प्रदीप पाटील

बलात्कार कुठल्यातरी एका कारणाने होत नाही. त्यामागे अनेक कारणे असतात. ती कारणे मनातल्या समजुतीत रूतलेली असतात. वेडीवाकडी फिरत इप्सित साध्य करतात. आपल्या येथे मुळात स्त्रीच्या बाबतीत विचार करताना एक विचार डोक्यामध्ये नेहमी असतो की, ‘स्त्री ही शुद्ध हवी’.

थोडक्यात तिचा इतर कोणाशीही नवर्‍याशिवाय शारीरिक संबंध असू नये, याला शुद्धता म्हटले जाते किंवा विवाहपूर्वी तिचे कोणाशीही संबंध आलेले नसले तर ती शुद्ध होय! आता यात गंमत अशी आहे की, पुरुषाचे कितीही संबंध पूर्वी किंवा तत्कालीन काळात आले तरी ते शुद्ध-अशुद्ध वगैरे काही बनत नाहीत.

दुसरी महत्त्वाची गोष्ट... ‘खानदान’. आमच्या खानदानामध्ये स्त्रिया या खानदानीच व शुद्ध असतात, असा तिरसट विचार मूळ धरून असतो. या अविचारामुळे स्त्रीवर मालकी हक्क गाजविण्याची दोषी मानसिकता तयार होते. अशा विचारांचे पुरूष निरामय स्त्री-पुरूष नात्याविषयी उदासीन असतात.

सेक्स आणि गुन्हेगारी!

जर स्त्री ही एक वस्तू आहे आणि तिचा वापर हवा तसा करता येऊ शकतो, असे डोक्यात भरले गेले असेल तर तिचा लैंगिक छळ केला जातो. ज्या पुरुषांच्या डोक्यात स्त्रियांविषयी अशा प्रकारच्या चुकीच्या कल्पना भरलेल्या असतात ते पुरुष लैंगिक बळजबरी करण्याची शक्यता मोठी असते. बर्‍याचवेळा असे म्हटले जाते की, ‘ती माझ्याकडे बघून हसली म्हणजे पटली’ किंवा ‘ती माझ्याशी बोलते म्हणजे मी तिला आवडलो आहे’, ‘ती माझ्याबरोबर डेटिंगला यायला तयार झाली म्हणजे ती सेक्ससाठी तयार आहे’, वगैरे.

म्हणजे स्त्रीची देहबोली ही जर तिच्या स्वतःच्या कामासाठी व नैसर्गिक असेल तर त्याचा अर्थ जो पुरुष चुकीचा काढतो तो त्या स्त्रीला लैंगिक त्रास देतो! काही पुरुषांना जबरदस्तीने सेक्स केल्याचा विकृत आनंद मिळतो. आणि तशा फॅन्टसीज ते करत असतात. काही पुरुषांच्या डोक्यात स्त्री म्हणजे आपली शत्रू आहे, असे कुठून तरी भरून घेतलेले असते. सेक्सविषयीचा आवेग हा काही पुरुषांचा विचित्र आणि आक्रमक असतो. शिवाय त्यांच्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती कमी अधिक प्रमाणामध्ये असते. अशांकडून बलात्कार होण्याची शक्यता असते.

कॉग्निटिव्ह बायस!

बलात्कार करणार्‍या पुरुषांवर संशोधन करण्यात आलेले आहे. त्यातून असे आढळले आहे की, लैंगिक हक्क स्त्रीवर बजावणे हे आपले परम कर्तव्य आहे, अशा दोषयुक्त मानसिकतेने हे बलात्कारी पछाडलेले असतात.

‘पिनाईल प्लेथेस्मोग्राफी’ नावाच्या तंत्राने जेव्हा त्यांची तपासणी करण्यात आली तेव्हा बळजबरीने सेक्स करण्याची त्यांची इच्छा ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर आढळली आहे. त्यांच्या स्वभावातील आक्रमकता दोष हा त्याला कारणीभूत ठरला आहे. दारू किंवा ड्रग्स यांच्या नशेमध्ये पुरूष असेल, तर स्वतःवरचा ताबा सुटून त्याला बलात्कार करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते.

स्त्री जर लैंगिक संबंधासाठी नाही म्हणत असेल, तर तिला धमकावून किंवा भीती दाखवून सेक्स वसूल करता येऊ शकतो. यावर ठाम विश्वास असणारे पुरुष हे बलात्कारी असतात. धमकी किंवा भीती दाखवणे हे प्रकार कदाचित त्याच्या घरामध्ये त्याच्या वडिलांकडून तो शिकलेला असू शकतो. साधारणपणे पारंपरिक पितृसत्ताक पद्धतीमध्ये पुरुष हा आक्रमक आणि वरचढ ठरवलेला असतो. त्यामुळे तसे संस्कार हे अशा विकृत समजुतीला तयार करण्यास कारणीभूत ठरतात.

या सर्व समजुतींना कॉग्निटिव्ह बायस असे म्हणतात. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण न ठेवता येणे हा मेंदूदोष दोष असू शकतो. स्मृतिदोष व नीट काम करता न येण्याचा दोष व्यक्तींच्या लैंगिक समजुतीत बिघाड निर्माण करतो. लैंगिक उत्तेजनेमध्ये विकृती असणे, या गोष्टी स्त्रीवर अत्याचार करायला भाग पाडतात. अशा व्यक्तींच्या समस्या सोडवणुकीच्या कौशल्यांचा काहीही पत्ता नसतो. आणि चुकीच्या समजुतीमुळे समाजात वारंवार त्यांचे इतरांशी खटके उडत असतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news