

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सातपूर, गंगापूर परिसरासह शहरात चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेल्या संशयितास गंगापूर पोलिस ठाणे गुन्हेशोध पथक व क्राइम युनिट-२ ने बेड्या ठोकल्या आहेत. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. गेल्या ६ सप्टेंबर रोजी शिवाजीनगर परिसरात देवानंद समाधान गिरी (२७) यांच्या घरात चोरीची घटना घडली होती. चोरट्याने घराच्या दरवाज्याचे कुलूप, कोंडा तोडून बेडरूममधील कपाटातील पंधरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे पँडल, लहान मुलीच्या कानातील रिंगा तसेच दहा हजार रुपये किमतीचा एलइडी टीव्ही लंपास केला होता.
या प्रकरणी हवा असलेला चोरटा शिवाजीनगर परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिस रवींद्र मोहिते यांना मिळाली होती. त्यानुसार मोहिते यांनी रात्र गस्त अधिकारी श्रीकांत निंबाळकर, राजेंद्र घुमरे, चंद्रकांत गवळी, सोमनाथ शार्दूल यांच्यासह गंगापूर पोलिस ठाण्याचे गिरीश महाले, सोनू खाडे, गोरख सांळुखे यांनी शिवाजीनगर कार्बन नाका परिसरात सापळा लावला होता. संशयित महेश बळीराम शिरसाठ (रा. गोवर्धन, गंगापूर गाव) कार्बन नाका परिसरात येताच त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून दहा हजारांचा एलईडी टीव्ही, २५ हजारांचा डेस्कटॉप, ५० हजारांचा लॅपटॉप तसेच अन्य एका घटनेतील ३५ हजारांचा एलईडी टीव्ही असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांच्याकडून अन्य चोरींच्या घटनांची उकल होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत निबांळकर, पोलिस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, रवींद्र मोहिते, गिरीश महाले, मिलिंद परदेशी, मच्छिंद्र वाकचौरे, गोरख साळुंखे, सोनू खाडे, सुजित जाधव, रणजित नलावडे, राजेंद्र घुमरे, चंद्रकांत गवळी, सोमनाथ शार्दुल यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.
हेही वाचा