

लासलगाव : विंचूर येथील कांदा व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या नितीन सीताराम जाधव (मूळ रा. जोूळ, ता. चांदवड) यांचा मृतदेह विहिरीत छातीला मोठा दगड बांधलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर हा प्रकार आत्महत्या आहे की, घातपात, याबाबत विविध चर्चा असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन जाधव हे विंचूर येथे कांदा व्यापाऱ्याकडे काम करीत होते. त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. मृतदेहाच्या छातीला मोठा दगड बांधलेला असल्याचे निदर्शनास आल्याने या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थलळी धाव घेत पंचनामा केला असून, मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला आहे. नितीन जाधव यांच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झालेले असून, नितीन जाधव यांच्या पश्चात पत्नी आणि लहान मुले असा परिवार आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे कोणाशी वैर नव्हते तसेच ते कोणत्याही मोठ्या मानसिक तणावाखाली असल्याची माहिती नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशीची मागणी नातेवाइकांनी केली आहे.
नातेवाइकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये मृतदेहाला बांधलेला मोठा दगड, तो कसा व कोणाकडून बांधला गेला, त्यासाठी कोणते साहित्य वापरले, मृत्यूपूर्वी नितीन जाधव कोणाच्या संपर्कात होते, ते शेवटचे कोणासोबत दिसले, त्यांच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड व घटनास्थल परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी झाली का आदी मुद्द्यांचा समावेश आहे. तसेच, नितीन जाधव यांच्या कामाच्या ठिकाणी काही वाद, आर्थिक व्यवहार किंवा अन्य कारणे होती का, याचाही तपास व्हावा, अशीही मागणी होत आहे. या प्रकरणात घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे सर्व शक्यता पडताळून निष्पक्ष चौकशी करावी, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली आहे.