

नाशिक : अश्वमेघनगर येथील युवकाच्या खुनानंतर उसळलेल्या वैमनस्यातून 20 ते 25 जणांच्या टोळक्याने दोन महिलांवर कोयत्याने हल्ला केल्याची गंभीर घटना पेठ रोडवरील आरटीओ कॉर्नर परिसरात घडली. या प्रकरणी समर्थ संदीप गवळी यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्वमेघनगर, पेठ रोड येथे 4 जानेवारी रोजी रवि उशिले या तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणी संतोष गवळी व ओम गवळी हे सध्या पोलिस कोठडीत आहेत. या घटनेचा राग मनात धरून उशिले कुटुंबीयांकडून गवळी कुटुंबावर हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
समर्थ गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रवि उशिले हा त्यांच्या बहिणीला त्रास देत होता. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादीचा भाऊ ओम गवळी व काका संतोष गवळी हे त्याच्याकडे गेले होते. त्यावेळी झालेल्या हाणामारीत रवि उशिलेचा मृत्यू झाला. या घटनेचा बदला घेण्याच्या उद्देशाने 4 जानेवारी रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास सुऱ्या, आर्यन मोगरे, कन्या बाबा व त्यांचे 20 ते 25 साथीदार गवळी यांच्या घराबाहेर आले.
या टोळक्याने गवळी यांच्या घराबाहेरील टपरी व दुचाकींची तोडफोड करत नुकसान केले. तसेच घरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी गवळी यांच्या आईच्या हातावर तसेच समर्थ गवळी यांच्या डाव्या खांद्यावर कोयत्याने वार करण्यात आला. या हल्ल्यात दोन महिला जखमी झाल्या असून, त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. ‘तुम्ही आमच्या भावाला मारले आहे, आम्ही तुमच्यापैकी कोणाचा तरी गेम करू,’ अशी धमकी हल्लेखोरांनी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात संबंधित आरोपी व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.