

देवळा : - देवळा शहरात प्रेमसंबंधाच्या कारणावरून दोघांमध्ये झालेल्या वादातून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना रविवारी दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास देवळा–नाशिक महामार्गावरील महादेव मंदिरासमोर, समर्थ ऑटोमोबाईल दुकानाच्या बाजूला घडली. याप्रकरणी फैजान आलम जमीर अहमद (वय २१, रा. उत्तराखंड, सध्या गुंजाळवाडी, ता. देवळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिपक रामदास भदाणे (रा. कापशी, ता. देवळा) याने एका महिलेसोबत असलेल्या अनैतिक प्रेमसंबंधाच्या कारणावरून हरविंदरसिंग सिद्धू कापसे यांच्याशी वाद घालून धक्काबुक्की केली.
दरम्यान, हरविंदरसिंग कापसे यांनी स्वतःला बीपी व शुगरचा त्रास असल्याचे सांगितले असतानाही, आरोपी भदाणे याने वाद अधिक चिघळवत धक्काबुक्की सुरूच ठेवली. या प्रकारात हरविंदरसिंग कापसे यांची प्रकृती अचानक बिघडली, ते जागेवरच कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला..
मृत हरविंदरसिंग सिद्धू कापसे हे उत्तर प्रदेश राज्यातील बिजनोर जिल्ह्यातील चांदपूर येथील रहिवासी होते. ते गेल्या बारा वर्षांपासून देवळा शहरात स्थायिक असून, मालेगाव रस्त्यावरील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये स्टील रेलिंगचा व्यवसाय करीत होते. व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी देवळा परिसरात चांगली ओळख निर्माण केली होती. या प्रकरणात संशयित आरोपी दिपक रामदास भदाणे याला देवळा पोलिसांनी अटक केली असून, त्याला पुढील कारवाईसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत व सहकारी अधिकारी करीत आहेत.