

नाशिक : पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत प्रतिबंधात्मक कारवाई दरम्यान गावठी कट्टा व धारदार हत्यार बाळगणाऱ्या दोघांना पंचवटी पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. या कारवाईमुळे दहशत निर्माण करण्याच्या तयारीत असलेला संभाव्य गुन्हा उघडकीस आला आहे.
रविवारी (दि.२१) गुन्हे पथक गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना हवालदार महेश नांदुर्डीकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, अमरधाम रोडवरील कन्नमवार ब्रिजखाली दोन व्यक्ती गावठी कट्टा व धारदार हत्यारासह संशयास्पद हालचाली करत आहेत. याबाबत नांदुर्डीकर यांनी ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांना कळविली. त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश देत सहायक पोलिस निरिक्षक सतिश शिरसाठ यांच्यासह गुन्हेशोध पथक घटनास्थळी रवाना केले. पथक घटनास्थळी पोहोचताच संशयित पळून जाण्याचा प्रयत्नात असतानाच पथकाने त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेतले. चौकशीअंती संशयिताची नावे अक्षय अविनाश जाधव (१९, रा. म्हाडा बिल्डींग, रूम नं. ५०२, बी- विंग, जत्रा हॉटेलजवळ, आडगाव, नाशिक) असे आढळून आले. त्याचा साथीदार एक विधीसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले. दोघांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून देशी बनावटीचा गावठी कट्टा व एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. या प्रकरणी सरकारतर्फे कर्मचारी अमोल देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सतिश शिरसाठ करीत आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त परिमंडळ- १ मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.