

मोबाईल खराब केल्याच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची चाकूने हत्या
आरोपी निलेश पवार याला हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा
हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल ४ वर्षे सक्तमजुरीची अतिरिक्त शिक्षा
इतर दोन आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता
निष्पाप मध्यस्थाचा मृत्यू; प्रकरणातील धक्कादायक वास्तव
जळगाव | प्रतिनिधी
मोबाईल खराब केल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाची चाकूने हत्या करणाऱ्या आरोपीला जळगाव सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. निलेश ऊर्फ बाळा प्रवीण पवार (वय २७, रा. कुसुंबे, ह.मु. रिंगरोड, जळगाव) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
ही घटना २१ ऑगस्ट २०२२ रोजी पिंप्राळा परिसरातील शिव कॉलनी स्टॉपजवळील देशी दारूच्या दुकानासमोर घडली होती. गणेश चव्हाण याने अमरसिंग ओंकार चव्हाण याचा मोबाईल खराब केल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी अक्षय अजय चव्हाण (वय २३) आणि त्याचा मित्र युवराज जाधव घटनास्थळी गेले होते.
यावेळी आरोपी निलेश पवार याने अचानक अक्षय चव्हाण याच्या छातीवर आणि पोटावर चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत अक्षयचा जागीच मृत्यू झाला. याच वेळी युवराज जाधव याच्यावरही चाकूने हल्ला करण्यात आला, ज्यात तो गंभीर जखमी झाला होता.
या प्रकरणाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एन. राजूरकर यांच्या न्यायालयात झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी निलेश पवार याला दोषी ठरवले. न्यायालयाने हत्येच्या गुन्ह्यासाठी (भा.दं.वि. कलम ३०२) जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंड, तर हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल (भा.दं.वि. कलम ३०७) ४ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
या खटल्यातील इतर दोन आरोपी अमरसिंग चव्हाण आणि सागर चव्हाण यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले. एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले.
जखमी युवराज जाधव याने नंतर साक्षीत पाठ फिरवली असली, तरी फिर्यादी शैलेश चव्हाण, पंच कैलास ठाकरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल सोनवणे आणि तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या साक्षी न्यायालयासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. या खटल्यात पैरवी अधिकारी ताराचंद जावळे आणि हिरालाल पाटील यांनी मदत केली.
या प्रकरणातील एक धक्कादायक बाब म्हणजे, ज्याचा मोबाईल खराब झाला आणि ज्याने तो खराब केला, त्या दोघांनाही प्रत्यक्षात काहीही झाले नाही. मात्र केवळ मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या निष्पाप अक्षयला आपला जीव गमवावा लागला, तर ज्याचा मोबाईलशी थेट संबंधही नव्हता, त्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली.