Nashik Fake Police |"तोतया पोलिसांचा 78 लाखांचा दरोडा उघड!; नाशिक गुन्हे शाखेकडून महिलेसह आंतरराज्य टोळी जेरबंद"

Nashik Fake Police | संशयितांना 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Nashik Fake Police
Nashik Fake Police
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पंचवटी परिसरातील दिंडोरी रोडवर भरदिवसा सरकारी दिवा लावलेल्या इनोव्हा कारमधून येत स्वतःला पोलीस असल्याची बतावणी करून व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत ७० लाखांची रोकड आणि मोबाईल लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक १ ने थरारक तपासातून पर्दाफाश केला आहे.

Nashik Fake Police
Dhule Robbery Case | अवघ्या काही तासांत रेशन दुकानातील चोरीचा छडा; चौघांना पोलिस कोठडी, पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त

या प्रकरणात एका महिलेसह चार जणांना कोणार्कनगर (आडगाव) येथून अटक करण्यात आली असून, आरोपींकडून रोकड, शस्त्रे, बनावट ओळखपत्रे आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा तब्बल ७८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयितांना २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये उमाशंकर प्रेमशंकर वर्मा (रा. उत्तर प्रदेश), सुनीलकुमार राजकिशोर दुबे (रा. झारखंड), दिलीप अशोक पप्पा (रा. नवी मुंबई) आणि संगीता हरिसिंग अहिरे (रा. जळगाव) यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

८ जुलै रोजी घडलेल्या या धाडसी दरोड्यानंतर आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि मुंबई-पुणे महामार्गावर सोडून पळ काढला होता. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक १ ने तातडीने तपासाची चक्रे फिरवली.

तपासादरम्यान घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती तसेच आरोपींच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. विविध पुराव्यांची सांगड घालत पोलिसांनी प्रथम एका संशयिताची ओळख निश्चित केली. त्यानंतर नाशिकरोड रेल्वेस्थानक, मुंबईतील जोगेश्वरी, अंधेरी, डोंबिवली, वसई आणि विरार परिसरात सापळे रचून आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. अखेर नियोजनबद्ध कारवाई करून चौघांनाही अटक करण्यात पोलिसांना यश आले.

आरोपींकडून ५७ लाख ९० हजार रुपये रोख, सरकारी दिवा बसवलेली गोल्डन रंगाची इनोव्हा कार, रिव्हॉल्व्हर, एमपी-५ रायफलसदृश शस्त्र, तसेच आयकर विभाग, गृहमंत्रालय, सीबीआय, अँटिकरप्शन ब्युरो आणि रेल्वे विभागाची बनावट ओळखपत्रे, बनावट रेल्वे पास, विविध सरकारी शिक्के आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या सर्व मुद्देमालाची किंमत सुमारे ७८ लाख ९० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहितीही पोलिसांनी दिली. या कारवाईत गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ मधील तांत्रिक विश्लेषण पथक, गोपनीय माहिती पथक, रेकी पथक, सायबर तपास पथक, मुद्देमाल रिकव्हरी पथक तसेच क्यूआरटी पथकाने समन्वयाचे काम करत गुन्ह्याचा छडा लावला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण तपास पथकाचे कौतुक केले.

असा लागला आरोपींचा सुगावा

पोलिसांना नाशिकरोड रेल्वेस्थानकावर एका संशयिताबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्याचा माग काढत तपास पथक डोंबिवली, वसई आणि विरारपर्यंत पोहोचले. या भागात पोलिसांनी तब्बल दोन दिवस मुक्काम ठोकून आरोपींच्या हालचालींवर गुप्तपणे लक्ष ठेवले. संशय येऊ नये म्हणून काही पोलीस साध्या वेशात वावरत होते.

एक पोलीस कॉन्स्टेबल रिक्षाचालक बनला होता, तर दुसरा पाणी बाटल्या विक्रेत्याच्या भूमिकेत परिसरात फिरत होता. यादरम्यान आरोपी तेथून सटकले व नाशिकरोड येथे आल्याची माहिती मिळाली. बिटको सिग्नल ते कोणार्कनगर (आडगाव) येथे पाठलाग करून या सर्वांना पकडण्यात आले.

Nashik Fake Police
Washim Crime | वाशिम शहरात सीसीटीव्हीत चेहरा लपवणारा 'कंबलवाला' अखेर जेरबंद; 7 दुकान फोडीची कबुली

अशा पद्धतीने आरोपींवर नजर ठेवून अखेर त्यांना जेरबंद करण्यात यश आले. आरोपींकडून आयकर विभाग, अँटिकरप्शन ब्युरो, रेल्वे विभाग आदी शासकीय यंत्रणांची बनावट ओळखपत्रे, रेल्वे पास आणि विविध बनावट सरकारी शिक्केही जप्त करण्यात आले.

..आणि नाशिकमध्ये पकडले गेले

आरोपी व महिला यांच्यामध्ये पैशावरून वाद झाला. तिनेसुद्धा मी पोलिसांना सांगून देईल, अशी धमकी दिली. आरोपींची हिम्मत एवढी वाढलेली होती की, चोरी केलेली इनोव्हाच पुन्हा ते नाशिकमध्ये घेऊन आले आणि पकडले गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news