

Sakri Ration Shop Robbery Solution
पिंपळनेर : साक्री तालुक्यातील महबंद (कुडाशी) येथील शासकीय रेशन दुकानात झालेल्या धाडसी घरफोडीचा पिंपळनेर पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत चार आरोपींना अटक केली. आरोपींकडून चोरीला गेलेला माल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकलींसह एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुरुवारी पहाटे २ ते ४ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी महबंद येथील पंढरीनाथ बारकु पवार यांच्या शासकीय रेशन दुकानाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. त्यांनी दुकानातील ५० हजार रुपये किमतीचे प्रत्येकी ५० किलो वजनाचे गव्हाचे दहा कट्टे चोरून नेले. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी साक्री तालुक्यातील पोबारे येथून चार संशयितांना ताब्यात घेतले.
प्रदीप छोटीराम गांगुर्डे (वय २५), गुलाब गोकुळ शिंदे (वय ३१), योगेश यशमल बहिरम (वय २४) आणि मंगेश गुलाब सावळे (वय २६, सर्व रा. पोबारे, ता. साक्री) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेले गव्हाचे कट्टे आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ७० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव सहारे यांच्या नेतृत्वाखाली अशोक पवार, कांतिलाल अहिरे, विश्वास हजारे, योगेश महाले, संदीप पावरा आणि पंकज वाघ यांच्या पथकाने केली.
धुळे : शिरपूर शहरातील किराणा दुकानात चोरी करणाऱ्या दोघांना अवघ्या चार तासात पोलीस पथकाने अटक केली आहे. या चोरट्यांकडून चोरीस गेलेली रोकड जप्त करण्यात आली आहे.
शिरपूर शहरातील बालाजी मंदिर जवळ बोहरा गल्लीमध्ये मनिष मोहनलाल अग्रवाल यांचे अक्षद ट्रेडींग किराणा दुकानातुन अज्ञात चोरटयांनी रोकड चोरून नेली होती. या संदर्भात शिरपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 305 (अ), 331(3), 331 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्हयाचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, यांना प्राप्त गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजचे आधारे अवघ्या 4 तासांत मतीन खलील तेली व मकसूद अख्तर मेहतर (दोन्ही लोहार गल्ली, शिरपूर ) यांना ताब्यात घेवून सखोल विचारपूस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. या दोघांकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.