

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कांदा बाजारपेठेतील शेतकऱ्यांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि बाजार समित्यांमधील गोंधळ याची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने अखेर त्यामध्ये लक्ष घातले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कांदा बाजार समित्यांवर नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार निफाड, चांदवड, देवळा, उमराणे, नांदगाव, सटाणा आदी प्रमुख कांदा बाजारांमध्ये तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी दररोज बाजारात उपस्थित राहून लिलाव प्रक्रिया, वजन काटे, दरनिर्धारण आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींची तपासणी करणार आहेत. काही दिवसांपासून कांदा बाजारांमध्ये व्यापाऱ्यांकडून मनमानीच्या तक्रारी वाढल्या होत्या. शेतकऱ्यांना योग्य दर न मिळणे, वजनात तफावत, लिलावात संगनमत आणि बाजारातील गोंधळ यामुळे प्रशासनाने थेट लक्ष घातले आहे.
प्रशासनाचे निर्देश
बाजार समितीत नियमित उपस्थित राहावे, पोलिस आणि बाजार समिती प्रशासनाशी समन्वय ठेवावा, शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अवैध प्रकार दिसल्यास तत्काळ कारवाई करावी, अहवाल वरिष्ठांना सादर करावा आदी निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
शेतकऱ्यांकडून स्वागत शेतकरी संघटनांनी प्रशासनाच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. "कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल योग्य आहे," असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.