

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न केवळ प्रशासनाच्या माध्यमातून सुटणारा नसून, त्यासाठी नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी महागडे किंवा परदेशी कुत्रे खरेदी करण्याऐवजी शहरात जन्माला आलेल्या भटक्या कुत्र्यांच्या पिलांना दत्तक घेऊन त्यांना घर देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, 'डॉग बाइट'च्या घटना आणि त्यातून निर्माण होणारा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या समस्येवर लसीकरण, निर्बीजीकरण आणि 'ॲनिमल बर्थ कंट्रोल' (एबीसी) केंद्रांच्या माध्यमातून उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
'डॉग बाइट' हा केवळ महाराष्ट्राचा नव्हे, तर देशभरातील गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर प्रशासनासोबत नागरिकांचा सहभागही आवश्यक आहे. शहरात जन्माला आलेल्या लहान पिलांना आपण घर देण्याचा प्रयत्न केला, तर एका जिवाला आधार मिळेल आणि आपल्या घराची सुरक्षाही वाढू शकते, असे प्रसाद यांनी सांगितले.
भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत असून, मोठ्या प्रमाणात लसीकरण केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मात्र, त्याबरोबरच निर्बीजीकरणाची व्यापक मोहीम राबवण्याची गरज आहे. एबीसी केंद्रांच्या माध्यमातून याबाबत काम सुरू असून, त्याला अधिक गती देण्याच्या सूचना नगरपालिकांना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकाऱ्यांच्या बैठकीत एबीसी केंद्रांच्या कामाबाबत स्पष्ट सूचना दिल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. तसेच डॉग, कॅट्स आणि स्ट्रीट ॲनिमल्सच्या प्रश्नावर स्थानिक स्वराज्य संस्थांनी अधिक गांभीर्याने आणि वेगाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करीत स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक उपाययोजना करण्यावरही प्रशासनाचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
'सेवा संकल्प अभियाना'मध्येही भटक्या प्राण्यांशी संबंधित प्रश्नांचा समावेश केला आहे. विशेषतः शहरात जन्माला आलेल्या कुत्र्यांच्या पिलांना नागरिकांनी दत्तक घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी जनजागृतीचे नियोजन आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांच्या भागीदारीतूनच सोडवावा लागेल, अशी भूमिका जिल्हाधिकारी प्रसाद यांनी मांडली.