Nashik Kumbh Mela | नाशिक कुंभमेळ्याचे होणार 100 % दस्तऐवजीकरण; कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांची घोषणा!

Nashik Kumbh Mela | शेखर सिंह : 2027 कुंभमेळ्याचे दस्तऐवजीकरण; 'स्मृती संग्रह' तयार होणार
Nashik Kumbh Mela
नाशिक : पत्रकार परिषदेत माहिती देताना कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना नाशिकसाठी नवी संकल्पना असली, तरी प्रयागराजमध्ये अशा प्रकारचे प्राधिकरण यशस्वीपणे कार्यरत राहिले आहे. त्याच धर्तीवर नाशिकमध्ये सुरू झालेले नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण केवळ २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करणारी यंत्रणा न राहता, भविष्यातील धार्मिक व सांस्कृतिक उत्सवांच्या नियोजनासाठी भक्कम पायाभरणी करणारे ठरेल, असा विश्वास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला.

Nashik Kumbh Mela
FDA Nashik | FDA ची धडक कारवाई! नाशिक विभागात 10 दिवसांत 5 कोटींचा भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा जप्त

सिंह यांनी गुरुवारी (दि. १७) दैनिक 'पुढारी'च्या नाशिक कार्यालयास भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी कुंभमेळा प्राधिकरणाचे कामकाज, त्यासमोरील अडचणी, नियोजनातील आव्हाने, सुरू असलेले प्रकल्प आणि भविष्यातील धार्मिक पर्यटनाच्या संधी याबाबत त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनाचा व्यापक दृष्टिकोन स्पष्ट केला. २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करताना सर्वात मोठी अडचण म्हणजे यापूर्वीच्या सिंहस्थ अथवा मोठ्या उत्सवांच्या नियोजनाची एकत्रित नोंद उपलब्ध नसणे, ही असल्याचे सिंह यांनी सांगितले.

ते म्हणाले, 'मागील उत्सवाचा अनुभव, उपलब्ध आकडेवारी आणि त्यावेळच्या व्यवस्थेच्या आधारे पुढील उत्सवाचे नियोजन करणे तुलनेने सोपे असते. मात्र, २०१५ मध्ये कोणत्या संस्थेने कोणते काम केले, कोणत्या पद्धतीने नियोजन केले, त्याचे परिणाम काय झाले, याची माहिती शोधताना अडचणी आल्या. उपलब्ध असलेले काही अहवाल, 'युनिसेफ'चा अहवाल आणि विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांचा अनुभव यांचा नियोजनासाठी उपयोग होत आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे १२ कोटी भाविक येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात किती भाविक येतील, कोणत्या दिवशी आणि कोणत्या ठिकाणी किती गर्दी होईल, याचा अचूक अंदाज बांधणे आव्हानात्मक असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले. पुढील काळात ते सोयीचे व्हावे यासाठी "घाटावर किती भाविक येतील, एका तासात किती भाविकांनी स्नान केले, कोणत्या मार्गावरून किती भाविक आले-गेले, शहरातील पार्किंगची क्षमता किती होती,

शहराबाहेरील पार्किंगचा वापर किती झाला, भाविकांची वाहतूक कोणत्या मार्गाने झाली, निवासाची व्यवस्था कशी होती, अशा प्रत्येक बाबीची नोंद केली जाणार आहे," असे त्यांनी सांगितले. थोडक्यात, २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे शंभर टक्के दस्तऐवजीकरण करण्यावर प्राधिकरणाचा भर आहे.

यासाठी केवळ कामांची नोंद न करता संपूर्ण व्यवस्थेचा एक 'स्मृती संग्रह' तयार केला जाणार आहे, जेणेकरून भविष्यात अधिकारी अथवा कर्मचारी बदलले, तरी हा दस्तऐवज उपलब्ध राहील आणि पुढील कुंभमेळ्यासह अन्य मोठ्या उत्सवांच्या नियोजनासाठी त्याचा उपयोग करता येईल, असे सिंह यांनी सांगितले. घाटांचे नियोजन, भाविकांची तासागणिक संख्या, वाहतूक व्यवस्था, पार्किंग, निवास, धार्मिक विधी, गर्दीचे स्वरूप, पायाभूत सुविधा आणि विविध विभागांमधील समन्वय यांची नोंद भविष्यातील नियोजनाचा आधार ठरणार आहे.

राज्यात धार्मिक कॉरिडोरची मालिका

सिंहस्थ २०२७ नंतरही पुढील १० ते ११ वर्षांचा कालखंड धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. पंढरपूर, भीमाशंकर, घृष्णेश्वर आणि महालक्ष्मी यासारख्या धार्मिक स्थळांशी संबंधित कॉरिडोरच्या माध्यमातून विकासकामांना चालना मिळत आहे. या सर्व प्रकल्पांच्या नियोजनात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विकसित केलेली कार्यपद्धती मार्गदर्शक ठरू शकते, असे सिंह यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर कॉरिडोरला कुंभमेळ्याचा हातभार

धार्मिक पर्यटनाला दिवसेंदिवस चालना मिळत असून, त्र्यंबकेश्वरला दररोज किमान २५ ते ३० हजार भाविक येत असल्याचे सिंह यांनी नमूद केले. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सध्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्र्यंबकेश्वरच्या सर्वंकष विकासाच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेल्या कॉरिडोर प्रकल्पाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

त्र्यंबकेश्वर कॉरिडोरचे काम प्रत्यक्ष सुरू झाले असून, सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी त्यातील मोठा भाग पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दर्शनपथासोबत घाट, शाहीमार्ग, शिवदर्शनपथ, विधी भवन आदी सुविधांचाही त्यात समावेश आहे. या प्रकल्पाचा थेट कुंभमेळ्याशी संबंध नसला, तरी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध झालेल्या निधीमुळे हा प्रकल्प हाती घेणे शक्य झाल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.

Nashik Kumbh Mela
Nashik Simhastha Kumbh Mela | नाशिक कुंभमेळ्याचे जागतिक ब्रँडिंग होणार! प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांचे महत्त्वाचे निर्देश

'गणपती, रहाडही जागतिक पातळीवर जावे'

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारल्या जाणाऱ्या यंत्रणा, माहिती संकलनाची पद्धत, गर्दीचे व्यवस्थापन आणि विभागांमधील समन्वय यांचे दस्तऐवजीकरण भविष्यात राज्यातील अन्य मोठ्या उत्सवांसाठीही वापरता येऊ शकते. महाराष्ट्रातील धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची मोठी संधी असल्याचेही सिंह यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील वृंदावन-बरसाना येथील होळी उत्सवाला मिळालेल्या जागतिक ओळखीच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गणपती उत्सव तसेच नाशिकच्या रहाडमधील रंगपंचमीसारख्या पारंपरिक उत्सवांचे नियोजन, ब्रँडिंग आणि व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सिंहस्थाच्या माध्यमातून ही पायाभरणी करण्याचा प्रयत्न आहे, असे सिंह यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news