

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पेट्रोल, डिझेल दरवाढीनंतर आता सीएनजी दरातही वाढ करण्यात आली आहे. गेल्या ९ मे रोजी सीएनजीच्या दरात दीड रुपयाची वाढ केली होती. त्यानंतर बुधवारी (दि. २७) पुन्हा एक रुपया ३५ पैशांची वाढ केल्याने, नाशिकमध्ये सीएनजीचा दर प्रतिकिलो ९६ रुपये ५० पैशांवर पोहोचला आहे.
अगोदरच पेट्रोल, डिझेलमधील दरवाढीने सर्वसामान्य हतबल झाले असताना, आता सीएनजी दरातही वाढ केल्याने महागाईचा आणखी भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिका - इराण युद्धामुळे इंधन दरात सातत्याने वाढ केली जात आहे. अवघ्या १० दिवसांच्या अंतरात पेट्रोल आणि डिझेल दरात चौथ्यांदा वाढ केली गेली. नैसर्गिक वायूच्या वाढलेल्या इनपुट कॉस्टमुळे आता सीएनजी दरातही वाढ केली जात आहे.
चालू महिन्यात सीएनजीचे दर दोनदा वाढविण्यात आल्याने, वाहनधारक चिंतेत सापडले आहेत. विशेषतः रिक्षा, टॅक्सी, व्यावसायिक वाहनधारकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावग्रस्त स्थिती कायम असून, ते वाढतच आहे. परिणामी देशभरात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून, उपलब्ध इंधनाच्या किमती कंपन्यांकडून वाढविल्या जात आहेत.
पेट्रोल डिझेलला सीएनजी उत्तम पर्याय असल्याचे मानले जात होते. मात्र, आता सीएनजीचे दरदेखील वाढत असल्याने, हा पर्याय खिशाला झळ पोहोचविणारा ठरत आहे. सीएनजीचे दर जवळपास डिझेलच्या दराइतकेच असल्याने, वाहनधारक चिंतेत सापडले आहेत. दरम्यान, वाढत्या सीएनजी दरांमुळे व्यावसायिक वाहनधारकांनी भाड्यांमध्ये वाढ केली आहे. त्याचा परिणाम वस्तूंच्या किमती वाढण्यावर होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य स्थिती बघता, पुढच्या काही दिवसांत सीएनजीच्या दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
पेट्रोल ६ ते ९ रुपयांनी वाढणार
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १० दिवसांत चौथ्यांदा वाढ झाल्यामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. मात्र, इंधनातील दरवाढ पुढच्या काळातही कायम राहण्याचा अंदाज आहे. सूत्रानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी ६ ते ९ रुपयांची वाढ केली जाणार आहे. ही दरवाढ टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. तसेच सीएनजीच्या दरातदेखील वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महागाईचा आणखी भडका उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पेट्रोलला पर्याय म्हणून सीएनजी बसवून घेतले. मात्र, आता सीएनजीचे दरही वाढत असल्याने, खिशाला झळ बसत आहे. ग्राहकांना वाढीव भाडे आकारले, तर ते देण्यास नकार देतात. अशात नफा-तोटा हा विचार न करता, भाडे वाहावे लागत आहे. शासनाने दरवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
-विलास गवळी, व्यावसायिक वाहनधारक