

नाशिक : पीएम ई-बस योजनेअंतर्गत महापालिकेला मिळणाऱ्या ५० इलेक्ट्रीकल बसेसच्या संचलनासाठी नोव्हेंबरमध्ये सिटीलिंक आणि जेबीएम ई मोबिलिटी कंपनी यांच्यात करार केला जाणार आहे. करारानंतर आॉपरेटर कंपनीला कार्यारंभ आदेश दिला जाणार असून, त्यानंतर बसेस पुरवठ्यासाठी कंपनीला दोन महिन्यांचा कालावधी दिला जाणार आहे. साधारणत: जानेवारीत सिटीलिंकच्या ताफ्यात नवीन ई बसेस दाखल होण्याची शक्यता आहे.
पर्यावरणपूरक बससेवेसाठी केंद्र सरकारच्या 'एन कॅप' योजनेअंतर्गत सुरुवातीला ५० इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार होत्या. मात्र, ही योजना अंमलात येऊन शकल्याने केंद्र सरकारने 'पीएम ई-बस' योजनेअंतर्गत महापालिकेला १०० ई-बस पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यात पहिल्या टप्प्यात ५० बसेसला मंजुरी मिळाली. नाशिकसाठी 'जेबीएम इकोलाईफ मोबीलीटी प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीची ऑपरेटर कंपनी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेला ५० बसेस पुरवठा करण्याची जबाबदारी या कंपनीवर असून त्यासाठी करारनाम्याची प्रक्रिया शिल्लक आहे. करारनामा केल्यानंतर संबंधित बसेस महापालिका रस्त्यावर चालवणे बंधनकारक आहे. मात्र, आडगाव येथील चार्जिंग स्टेशनचे काम अद्याप अपूर्ण असल्यामुळे करारनाम्याची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. आडगाव येथे जवळपास दहा कोटी रुपये खर्च करून चार्जिंग स्टेशन उभारले जात असून काम अंतिम टप्प्यात आहे. महावितरणकडून वीज जोडणी दिली नसल्यामुळे डेपो कार्यान्वित झाला नव्हता.
५० इलेक्ट्रिकल बसेस साठी जेबीएम ई मोबिलिटी या आॉपरेटक कंपनीसमवेत नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये करारनामा केला जाणार आहे. त्यानंतर आडगाव येथील चार्जिंग स्टेशन मधील लहान मोठी कामे पुढील अडीच महिन्यामध्ये पूर्ण होतील आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवीन इलेक्ट्रिकल बसेस नाशिकमध्ये येतील.
बाजीराव माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिटीलिंक.
मध्यंतरी महावितरणला या खर्चापोटी साडेतीन कोटी रुपये द्यावे लागणार होते. मात्र शासकीय प्रकल्प असल्यामुळे तसेच महावितरणने ३३ केव्ही विज जोडणीचे दर अलीकडेच कमी केले असल्यामुळे महापालिकेने सुधारित खर्च निश्चित करून देण्याची मागणी केली होती. त्यावर तोडगा निघत नसल्यामुळे बस पुरवठादार यांच्यासोबत करारनामा करता येत नव्हता. मध्यंतरी आयुक्त मनीषा खत्री यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केल्यानंतर प्रथम काम करून घ्या त्यानंतर खर्च सवलतीच्या दरामध्ये निश्चित केला जाईल असे आश्वासन मिळाले. त्यानुसार आता आडगाव महावितरण केंद्रामधून ३३ केव्ही विज जोडणीचे काम सुरू झाले असून पुढे अडीच महिन्यामध्ये बस डेपोला संबंधित कनेक्शन जोडले जाईल. त्यानंतर नवीन फिडर उभारणे व तेथून अन्य इलेक्ट्रिकल कामे करण्यासाठी अडीच महिन्याचा कालावधी लागणार असून त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये इलेक्ट्रिकल बसेस शहरातील रस्त्यांवर धावणार आहेत.