

नाशिक: आसिफ सय्यद
अल्पावधीतच नाशिकची जीवनवाहिनी बनलेल्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या 'सिटीलिंक-कनेक्टींग नाशिक' या शहर बससेवेने ५० महिन्यांचा पल्ला गाठला आहे. सेवेच्या पाचव्या वर्षांत पदार्पण केलेल्या सिटीलिंकच्या अडीचशे बसेसमार्फत आतापर्यंत ६.३६ कोटी किलोमीटरचा प्रवास केला असून या माध्यमातून आतापर्यंत ९.१५ कोटी प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घेतला आहे.
महापालिकेच्या माध्यमातून ८ जुलै २०२१ पासून सिटीलिंकच्या शहर बससेवेला टप्प्याटप्प्याने सुरुवात करण्यात आली. या बससेवेसाठी सीएनजीच्या २०० तर डिझेलच्या ५० बसेस आॉपरेटर्सच्या माध्यमातून चालविण्यात येत आहेत. सद्यस्थितीत तपोवन डेपो येथून एकूण २९ मार्गांवर १५० बसेसच्या माध्यमातून तर नाशिकरोड डेपो येथून २८ मार्गांवर १०० बसेसच्या माध्यमातून सेवा पुरविली जाते. दोन्ही डेपो मिळून पहिल्या एकूण ५७ मार्गांवर २५० बसेसच्या माध्यमातून सेवा पुरविली जाते. पहिल्यावर्षी अर्थात जुलै २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत १०४ बसेस रस्त्यावर उतरविण्यात आल्या होत्या.
सुरुवातीच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत याबसेस सरासरी २१ हजार ६२३ किलोमीटर दररोज याप्रमाणे ७५ लाख ७३ हजार ५०७ किलोमीटर धावल्या. या माध्यमातून पहिल्यावर्षी ८५ लाख ५६ हजार ७५१ प्रवाशांना सेवा दिली गेली. दुसऱ्या वर्षी एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत २०९ बसेस रस्त्यावर उतरविण्यात आल्या. या बसेस ४४ हजार ९७२ किलोमीटर दररोज याप्रमाणे एक कोटी ६४ लाख १४ हजार ८४८ किलोमीटर धावल्या. या माध्यमातून दोन कोटी ३७ लाख १० हजार ५६२ प्रवाशांना सेवा दिली गेली. तिसऱ्या वर्षांपासून सर्वच २५० बसेस रस्त्यावर उतरविल्या गेल्या. या माध्यमातून ४५ हजार ५८९ किलोमीटर दररोज याप्रमाणे १ कोटी ६६ लाख ३९ हजार ९६५ किलोमीटर बसेस धावल्या. या माध्यमातून दोन कोटी ४६ लाख ९८ हजार २८८ प्रवाशांनी लाभ घेतला. चौथ्या वर्षी ४६ हजार ९३० किलोमीटर दररोज या प्रमाणे १ कोटी ७२ लाख ७० हजार १६ किलोमीटर बसेस धावल्या असून या माध्यमातून दोन कोटी ४० लाख ३३ हजार ९१२ प्रवाशांनी सिटीलिंकच्या बससेवेचा लाभ घेतला. एप्रिल ते आॉगस्ट २०२५ या गत पाच महिन्यांच्या कालावधीत ७५ लाख ५५ हजार २८१ किलोमीटर बसेस धावल्या असून एक कोटी पाच लाख ९६ हजार ८८६ प्रवाशांनी लाभ घेतला आहे.
243 कोटींचा महसूल
सिटीलिंकने गेल्या ५० महिन्यांमध्ये प्रवाशांकडून तिकीटांच्या तसेच प्रवासी पासच्या माध्यमातून तब्बल २९२ कोटी ६१ लाख ३१ हजार ७४५ रुपयांचा महसूल मिळविला आहे. पहिल्यावर्षी २२ कोटी ६३ लाख ९४ हजार १५० रुपये, दुसऱ्या वर्षी ७४ कोटी ३ लाख ८२ हजार २९४ रुपये, तिसऱ्यावर्षी ८१ कोटी १७ लाख ८७ हजार ४४९ रुपये, चौथ्या वर्षी ७८ कोटी ८६ लाख १७ हजार ७०३ रुपयांचा महसूल सिटीलिंकला प्राप्त झाला आहे.
दीडशे कोटींचा तोटा
सिटीलिंकची बससेवा अल्पावधीतच नाशिककरांच्या पसंतीस उतरली आहे. नाशिकसह लगतच्या २० किलोमीटर क्षेत्रातील ग्रामीण भागातही सिटीलिंकामार्फत सेवा पुरविली जात आहे. मात्र, ही बससेवा तोट्यात आहे गेल्या ५० महिन्यांमध्ये सिटीलिंकला सुमारे दीडशे कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. महापालिकेच्या निधीतून हा तोटा भरून काढला जात आहे. त्यामुळे विकासकामांच्या निधीचा तुटवडा निर्माण झाला आहे.
सिटीलिंकच्या माध्यमातून नाशिककरांना सुरक्षित, सुलभ, दर्जेदार बससेवा पुरविली जात आहे. बससेवेतून होणारा तोटा कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. लवकरच इलेक्ट्रीक बसेसही सिटीलिंकच्या ताफ्यात दाखल होत आहेत.
बाजीराव माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिटीलिंक.
मनपाला मिळणार 50 इलेक्ट्रीक बस
पीएम ई-बस योजनेअंतर्गत महापालिकेला ५० इलेक्ट्रीक बसेस मिळणार आहेत. यासाठी जेबीएम इको लाईफ या आॉपरेटरची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी आडगाव ट्रक टर्मिनस येथे उभारण्यात येत असलेल्या ई-बस डेपोचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. ई-बसेसकरिता चार्जिंग स्टेशनचे कामही अंतिम टप्प्यात आहे. दिवाळीनंतर साधारणत: नोव्हेंबर महिन्यात सिटीलिंकच्या ताफ्यात ई-बसेस दाखल होणार आहेत.