

नाशिक : सिटीलिंक वाहकाची सतर्कता आणि प्रामाणिकपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे. बसमध्ये प्रवाशाची राहून गेलेली बॅग व सुमारे २९ हजाराची रक्कम प्रवाशाला परत करण्यात आली.
बुधवारी (दि.८) वरुण शर्मा नामक प्रवासी नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर मार्गावर बस क्रमांक एम. एच. १५ जी. व्ही. ८०४१ या बसमध्ये बसले. मात्र त्यांचा प्रवास संपल्यानंतर घाईगडबडीत ते आपली बॅग बसमध्येच विसरले. काही वेळाने सदर बॅग महिला वाहक दुर्गा दळवी यांच्या निदर्शनास आली. सदर बॅगची तपासणी केली असता बॅगमध्ये सुमारे २९५०० रुपये इतकी रक्कम आढळून आल्याने वाहक दळवी यांनी प्रामाणिकपणा दाखवत तात्काळ सिटीलिंक कार्यालयाशी संपर्क साधला. सदर बॅग व रोकड कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली. सिटीलिंक अधिकाऱ्यांनी प्रवाशासोबत संपर्क साधत त्यांना कार्यालयात बोलावून घेतले. संपूर्ण खातरजमा करत सदर बॅग, रोकड प्रवासी वरुण शर्मा यांच्या ताब्यात दिली. दुर्गा दळवी यांचा सिटीलिंकचे उपमहाव्यवस्थापक संजय सुर्वे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांना ५०० रुपयांचे बक्षीसही देण्यात आले.