

नाशिक / सिडको : पुढारी वृत्तसेवा
जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल सुमारे ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यश जानावलकर, युवराज जानावलकर, संगीता जानावलकर व सुरेश जानावलकर (सर्व रा. मंगलमूर्तीनगर, सिडको) यांनी संगनमत करून फिर्यादी संदीप सिंग (रा. श्रमिकनगर, सातपूर) यांच्यासह त्यांच्या ओळखीतील इतर गुंतवणूकदारांना फसवले. संशयित आरोपींपैकी यश व युवराज जानावलकर यांनी 'फ्युचर स्टॉक मार्केट एनालिसिस' नावाची इन्व्हेस्टमेंट फर्म असल्याचे सांगून या फर्ममध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा ३ ते ७ टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवले होते.
या आमिषाला भुलून फिर्यादी संदीप सिंग यांनी एप्रिल २०२३ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत वेळोवेळी एकूण ९ लाख १० हजार रुपये गुंतवले. तसेच योगेश परदेशी यांच्याकडून १७ लाख ५९ हजार १२५ रुपये, राहुल प्रजापती यांच्याकडून ६ लाख ७१ हजार रुपये, हेमांगिनी मटाले यांच्याकडून १२ लाख ४३ हजार ३६१ रुपये, तर अश्विन खैरनार यांच्याकडून १४ लाख १५ हजार रुपये अशी रक्कम आरोपींनी घेतली.
यामध्ये एकूण ५९ लाख ९८ हजार ८८६ रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. मात्र, आरोपींनी ही रक्कम सांगितलेल्या 'फ्युचर स्टॉक मार्केट' च्या खात्यात न टाकता स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यांमध्ये तसेच षसंगीता एंटरप्रायझेस' या फर्मच्या खात्यावर वळवली. सुरुवातीला थोडाफार परतावा देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यात आला.
त्यानंतर ठरल्याप्रमाणे परतावा न देता गुंतवलेली संपूर्ण रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी फिर्यादी संदीप सिंग यांच्यासह इतर गुंतवणूकदारांची एकूण सुमारे ६० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद अंबड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.