Nashik Kumbh Mela | नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा 'कुंभ नियंत्रण कक्ष'

Nashik Kumbh Mela | नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा 'कुंभ नियंत्रण कक्ष'; सिंहस्थ नियोजनावर थेट देखरेख, जि. प.च्या जुन्या इमारतीत थाटणार कार्यालय
Nashik Kumbh Mela 2027
Nashik Kumbh Mela 2027 Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळा नियोजन जागतिक दर्जाचे व्हावे, विकासकामांवर प्रभावी नियंत्रण राहावे आणि कोणत्याही प्रकारच्या वादामुळे राज्य सरकारची प्रतिमा मलीन होऊ नये, या उद्देशाने नाशिकमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचे स्वतंत्र कुंभ नियंत्रण केंद्र स्थापन करण्याची तयारी सुरू झाली आहे.

Nashik Kumbh Mela 2027
Illegal Kayaking | बागा येथे बेकायदा 'कयाकिंग' व्यवसाय

या कार्यालयात मुख्यमंत्री, कुंभमेळामंत्री तसेच समन्वयकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असून, यासाठी जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीची निवड झालेली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कार्यालयासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नुकतीच जागेची पाहणी केली असून, आवश्यक सुविधांबाबत प्राथमिक आढावाही घेतला आहे.

कुंभमेळा ध्वजारोहणापासून किमान एक वर्ष हे कार्यालय कार्यरत राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्यानंतर नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थाच्या नियोजनाला राज्य सरकारने विशेष प्राधान्य दिले आहे. प्रारंभी सुमारे २४ हजार कोटी रुपयांच्या आराखड्यात कपात करून तो आठ हजार कोटींपर्यंत आणण्यात आला होता. मात्र, प्रयागराज कुंभानंतर नियोजनाचा फेरआढावा घेत जवळपास ३४ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना गती देण्यात आली.

सिंहस्थासाठी स्वतंत्र कुंभमेळा मंत्रिपद, त्रिस्तरीय कुंभमेळा प्राधिकरण आणि मंत्रालय, विभागीय तसेच स्थानिक पातळीवरील विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. सध्या विकासकामांना वेग आला असला, तरी काही कामांच्या गुणवत्तेबाबत आणि निविदा प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

अलीकडेच सुमारे २,८०० कोटी रुपयांच्या रस्ते विकासकामांमध्ये ठेकेदारांच्या कथित 'रिंग'बाबत आरोप झाल्यानंतर शासनाने चौकशी समिती नेमली आहे. या पार्श्वभूमीवर सिंहस्थाच्या तयारीबाबत नकारात्मक संदेश जाऊ नये आणि महत्त्वाच्या कामांवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून थेट देखरेख राहावी, यासाठी हे स्वतंत्र कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा प्रशासनात आहे.

सिंहस्थकामांमध्ये समन्वय साधणार

हे कार्यालय नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर नगरपरिषद, जिल्हा प्रशासन आणि विविध शासकीय विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधण्याचे केंद्र म्हणून काम करणार आहे. विकासकामांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याबरोबरच देश-विदेशातील मान्यवरांना निंत्रित करणे, व्हीव्हीआयपींच्या भेटींचे नियोजन, स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवणे आणि सिंहस्थाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्याची जबाबदारीही या कार्यालयाकडे असणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Nashik Kumbh Mela 2027
Jennifer Monserrate | जेनिफर मोन्सेरात यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप; हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार

कक्ष उभारणीमागील प्रमुख कारणे

  • सिंहस्थ कुंभमेळ्याचे जागतिक स्तरावर प्रभावी सादरीकरण.

  • विकासकामांवर थेट देखरेख आणि दर्जेदार अंमलबजावणी.

  • आरोप-प्रत्यारोपांमुळे निर्माण होणारा नकारात्मक संदेश रोखणे.

  • नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर नगर परिषद आणि शासन यांच्यात समन्वय वाढविणे.

  • देश-विदेशातील मान्यवर आणि व्हीव्हीआयपींसाठी स्वतंत्र नियोजन.

  • नाशिककरांचा सहभाग वाढवून लोकसहभागातून सिंहस्थ यशस्वी करणे.

  • सिंहस्थाच्या माध्यमातून महाराष्ट्राची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सकारात्मक प्रतिमा निर्माण करणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news