

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्यात वॉटर स्पोर्ट्स या क्रीडा प्रकाराला बंदी असताना पर्यटकांच्या सुरक्षेला धाब्यावर बसवून बागा परिसरात सध्या बेकायदा 'कयाकिंग' व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याचा दावा करण्यात आला आहे. कोणतीही परवानगी नसताना हा वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू आहे.
याला स्थानिक पोलिस, तसेच सरकारी यंत्रणांचा छुपा वरदहस्त असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हळदोण्याचे आमदार ॲड. कार्लोस अलवारीस फरेरा यांनी याला तीव्र आक्षेप घेत संबंधित ऑपरेटरवर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत समुद्रातील वाढत्या धोक्यामुळे मासेमारीसह सर्व प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्सवर अधिकृतपणे पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
असे असतानाही बागा परिसरात नियम धाब्यावर बसवून हे धोकादायक खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आले. शासकीय बंदी असतानाही पर्यटकांच्या जिवाशी खेळणारे हे बेकायदेशीर उद्योग कोणाच्याही भीतीशिवाय राजरोसपणे सुरू आहेत. यामुळे पर्यटकांचा जीव धोक्यात आला असून, प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे, अशी आग्रही मागणी आमदार ॲड. कार्लोस फरेरा यांनी केली आहे.