नाशिक : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा : मनपा आयुक्तांचे आवाहन

नाशिक : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा : मनपा आयुक्तांचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी केले आहे. जलप्रदूषणमुक्तीसाठी यंदाही कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाणार आहे. विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडण्यासाठी मार्ग खड्डेमुक्त करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात बैठक झाली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. करंजकर यांनी यावेळी दिले. गतवर्षी २००९ ठिकाणी गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल उभारले होते. विक्रेत्यांनी शाडू मातीच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन केले होते. गणेशमूर्तीसाठी पर्यावरणपूरक रंगांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. गणेशमूर्ती विक्री करणाऱ्या स्टॉलधारकांना महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. पर्यावरणपूरक आरास स्पर्धा आयोजित कराव्यात. उत्कृष्ट मंडळांना बक्षिसे शासनाकडून दिली जाणार आहेत, त्या दृष्टीने समितीद्वारे मंडळाच्या पर्यावरणपूरक देखाव्याच्या आरासाची माहिती घ्यावी, अशा सूचना डॉ. करंजकर यांनी केल्या. विसर्जन मिरवणूक मार्गावरील सर्व खड्डे बुजविण्याचे निर्देश यावेळी बांधकाम विभागाला दिले. तसेच घनकचरा विभागामार्फत सर्वत्र स्वच्छता करणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांनी नदीपात्रात निर्माल्य टाकू नये. टाकल्यास दंडात्मक कारवाईच्या सूचना यावेळी दिल्या.

शाडू मूर्तिकारागिरांना मोफत जागा

दरम्यान, शाडूच्या मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तिकारांना प्रत्येक विभागीय कार्यालयात जागा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णयही पालिका प्रशासनाने घेतला आहे. मनपाच्या ६ विभागीय कार्यालयांमध्ये शाडू मातीचे स्टॉल उभारले जाणार असून, शाडू मातीच्या मूर्ती माफक दरांमध्ये नागरिकांना उपलब्ध करून देणार असल्याची माहिती पर्यावरण विभागाचे उपआयुक्त डॉ. विजय कुमार मुंडे यांनी दिली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news