

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंचवटी विभागात शुक्रवारी (दि. २) माघारीच्या अंतिम दिवशी भाजप अंतर्गत माघारीचा हायव्होल्टेज ड्रामा बघावयास मिळाला, प्रभाग ६ मधून भाजपचे बंडखोर ज्ञानेश्वर काकड यांना माघारी घेऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी घरात कोंडून ठेवले होते. काकड यांच्या घराला कार्यकर्त्यांकडून साखळी कुलूप लावण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप केला.
दुसरीकडे, प्रभाग २ मधील भाजपचे माजी नगरसेवक रुची कुंभारकर यांना उमेदवारी दिली नसल्यामुळे अपक्ष उमेदवारी केली. त्यांच्या माघारीवरून गोंधळ झाला. माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र आणि प्रभाग ३ चे उमेदवार मच्छिंद्र सानप, पप्पू माने यांनी कुंभारकर यांना हात धरत माघारीसाठी आणण्याचा प्रयत्न केला. माघाराची मुदत संपल्यामुळे कुंभारकर यांची अपक्ष उमेदवारी कायम राहिली.
शहरातील अनेक प्रभागांत भाजपकडून उमेदवारी मिळाली नसल्यामुळे बंडखोरी करत निष्ठावंतांनी अर्ज दाखल करत अपक्ष म्हणून रिंगणात उड्या घेतल्या, या निष्ठावंतांची समजूत घालण्याचा प्रयत्न दोन दिवसांपासून वरिष्ठांकडून सुरू होता. मात्र, आवारामांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे निष्ठावंतांमध्ये तीव्र नाराजी होती.
ती माघारीच्या दिवशीही दिसून आली. प्रभाग ६ मधून भाजपकडून उमेदवारी मिळाली नसल्यामुळे काकड यांनी पत्नीसह उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी माघार घेऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी शुक्रवारी त्यांच्यावर दबाव टाकला होता. कार्यकत्यांनी त्यांना घरात कोंडून ठेवले होते. अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवावा यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्या दाराला साखळी कुलूप लावले होते.
हा खेळ एक ते दीड तास सुरू होता. अखेर, कार्यकर्त्यांची समजूत काढत काकड घराबाहेर पडले. त्यांनी अपक्ष अर्ज मागे घेतला. परंतु, काकड यांनी पत्नीची अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. प्रभाग ३ क मधून उमेदवारी मिळाली नसल्यामुळे अर्ज दाखल केलेले कुंभारकर यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला होता. शेवटच्या काही वेळात पक्षाने समजूत काढल्यामुळे माघारीसाठी कुंभारकर विभागीय कार्यालयात पोहोचले.
मात्र, कुंभारकर यांच्या समर्थकांकडून माघार घेऊ नका, असे सांगत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर गोंधळ घातला, भाजपचे उमेदवार सानप, माने यांनी कुंभारकर यांना अर्ज माघारीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नेले. मात्र, वेळ संपल्यामुळे कुंभारकर यांची माघार होऊ शकली नाही. कुंभारकर यांनी निवडणूक लढणार असल्याचा निर्णय घेत भाजपविरोधात बंडखोरीचे निशाण फडकाविले.
या बंडखोरांची माघार
प्रभाग ३ मध्ये भाजप अंतर्गत निष्ठावंतांनी बैठक घेत पक्षावर नाराजी उघडपणे व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्या बंडखोरीचे मोठे आव्हान होते. मात्र, शुक्रवारी माघारीच्या दिवशी किशोर बेलसरे, उज्ज्वला बेलसरे, राहुल खोडे, स्निग्धा खोडे, सोमनाथ बोडके, श्याम पिंपरकर यांनी माघार घेतली. माजी नगरसेविका शीतल माळोदे यांनी प्रभाग २ ड मधून माघार घेतली. प्रभाग १ मधून अमित घुगे यांनी मात्र आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.
भावनिक अन् अश्रू अनावर
कुंभारकर यांना माघारीसाठी कार्यालयात नेण्यात आले असता, तुमच्यावर दबाव आहे का अशी विचारणा माध्यमांनी केली. परंतु त्यांनी दबाव नसल्याचे सांगितले. त्यानंतर, माघारीची मुदत संपल्याने ते कार्यालयाबाहेर आले असता, त्यांना माध्यमांनी गराडा घालत माघारीबाबत विचारणा केली. परंतु, मला बोलायचे नाही असे सांगत, त्यांना अश्रू अनावर झाले अन् ते भावनिक झाले. अश्रू पुसत त्यांनी कार्यालयाबाहेरून काढता पाय घेतला.