

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाशिकमध्ये येत्या ९ जानेवारीस संयुक्त सभा होणार आहे. उबाठा, मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर ही सभा होत असून, दोन दशकांनंतर प्रथमच दोन्ही भाऊ एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या सभेकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
मुंबईसह राज्यभरातील महापालिका निवडणुकांसाठी दोन दशकांनंतर प्रथमच दोन्ही भाऊ एका व्यासपीठावर दिसणार उद्धव आणि राज ठाकरे बंधूंनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. निवडणूक जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभांचे आयोजन मुंबईसह नाशिकमध्ये केले जाणार आहे.
३ ते १३ जानेवारीपर्यंत दोन्ही बंधूंच्या मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये संयुक्त सभा होतील. त्यात नाशिकसाठी ९ जानेवारीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. नाशिक महानगरप्रमुख प्रथमेश गिते तसेच उबाठा कार्यालयाने जाहिरात व परवाने विभागाकडे पत्र देत मैदानाची जाहीर सभेसाठी मागणी नोंदवली. त्यानुसार ९ जानेवारीस दोन्ही बंधूची संयुक्त सभा प्रथमच नाशिकमध्ये होणार आहे.
एकत्रित शिवसेना असताना उद्धव आणि राज ठाकरे यांनी नाशिकला एकाच व्यासपीठावर अनेकवेळा भाषणे केली असली तरी शिवसेना आणि मनसेच्या विभाजनानंतर दोन स्वतंत्र पक्षाचे दोन सर्वोच्च नेते म्हणून ते प्रथमच नाशिकच्या व्यासपीठावर एकत्र येणार आहे. दोन्ही सेनेच्या पदाधिकारी, कार्यकत्यांत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आदित्य, अमितचा रोड शो आदित्य आणि अमित ठाकरे बंधूदेखील महापालिका निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत, आदित्य आणि अमित ठाकरे मुंबईप्रमाणेच नाशिकमध्येदेखील रोड शो करणार आहेत. दोन्ही बंधू एकत्र रोड शो करणार असल्याने नाशिककरांचे लक्ष लागले आहे.