

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एबी फॉर्म पळवापळवीत पक्षाचे अधिकृत उमेदवार अनधिकृत ठरल्याने आमदार सीमा हिरे यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची भेट घेत सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
पक्षातील गैरप्रकारामुळे निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची भावना त्यांनी पक्षनेतृत्वाकडे मांडली. पक्षाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. मनपा निवडणुकीत एबी फॉर्मवाटपावरून झालेल्या राड्यानंतर दोन एबी फॉर्म दिल्याने मुकेश शहाणे यांच्यासह पक्षाच्या चार अधिकृत उमेदवारांचे एबी फॉर्म अग्राह्य धरले गेले, सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबातच तीन उमेदवार रिंगणात उतरल्याने भाजपमध्ये रणकंदन सुरू झाले.
'राडा' संस्कृतीपासून दूर असलेल्या तसेच 'पार्टी विथ डिफरन्स' असलेल्या भाजपमध्येच अशी अंतर्गत गटबाजी सुरू झाल्याने या प्रकारांविषयी शहराध्यक्ष सुनील केदार यांनी तत्काळ मेल करत पत्राद्वारे या बाबी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कानी घातल्या. दुसऱ्या दिवशी गुरुवारी पश्चिमच्या आ. सीमा हिरे यांनी थेट मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली. झाल्या प्रकाराबाबत निवेदन सादर करत सुरू असलेल्या गैरप्रकाराला लगाम घालण्याची विनंती त्यांनी केली.
बडगुजर यांच्यामुळे उमेदवारीपासून वंचित राहिलेल्या निष्ठावंतांत नाराजी असल्याचे आ. हिरे यांनी सांगितले. २०१७ मधील निवडणुकीत शिवसेनेत असताना एबी फॉर्मसंदर्भात बडगुजर यांनी असाच प्रकार केल्याची आठवणही हिरे यांनी प्रदेशाध्यक्षांना करून देत निष्ठावंतांना न्याय देण्याची मागणी केली.
अनेक वर्षांपासून जीवाचे रान करणाऱ्या निष्ठावंतांना एबी फॉर्म मिळण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागते. दुसरीकडे एकाच घरात पाच उमेदवारी आणि हातात १० एबी फॉर्म कुणामुळे मिळाले. या मागे कोण आहेत याची चौकशी व्हावी. - सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम
- सुधाकर बडगुजर, भाजप नेते
अनेक वर्षांपासून जीवाचे रान करणाऱ्या निष्ठावंतांना एबी फॉर्म मिळण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागते. दुसरीकडे एकाच घरात पाच उमेदवारी आणि हातात १० एबी फॉर्म कुणामुळे मिळाले. या मागे कोण आहेत याची चौकशी व्हावी.
- सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम