

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इंदिरानगर परिसरातील भोंदू कमलेश महाराज अधिकारीने सोलापूरमधील दोन भावांना मृत्यूची भीती दाखवून त्यांची दोन एकर जमीन व दीड लाख रुपयांची फसवणूक केली होती. त्यामुळे त्याच्या विरोधात जादूटोणाविरोधी कायद्यान्वये इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
आणखी सहा व्यक्तींनी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे दोषारोपपत्र अधिक मजबूत होईल, असा विश्वास अंनिसने व्यक्त केला आहे. आणखी कुणी पीडित असेल, तर अंनिस किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे अवाहन अंनिसने केले आहे. लोहगाव (पुणे) येथील रत्ना अशोक पाटील या महिलेला शारीरिक त्रास होता.
त्यासाठी तंत्रविद्या करावी लागेल, या बहाण्याने भोंदूबाबाने स्मशानात अघोरी पूजा करत व पशुबळी देत चार लाख रुपये घेतले होते. त्यासाठी उज्जैनला नेण्यात आले होते. काही दिवसांनंतर पीडितेच्या परिवाराला कोलकोताला विमानाने नेऊन महाकालीच्या ठिकाणी अघोरी पूजा करण्यात आली होती. तो सर्व खर्च पीडितेकडून करण्यात आला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील भगीरथ भगवान कटके यांनी भोंदूचे यू ट्यूब चॅनल पाहून नाशिकला आले. भोंदूने त्यांना पितृदोष असल्याचे सांगितले होते. भोंदूने त्याच्या महाधिविद्यान विद्या ट्रस्टमध्ये त्यांना सदस्य करून घेतले. नंतर बाबाचे काळे कारनामे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी ट्रस्टच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
मुंबई येथील संजयभाई मखवाणाजी, दर्जीभाई व इतरांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. याकामी अंनिसचे कृष्णा चांदगुडे, व्ही. टी. जाधव, राजेंद्र दरोडे, अॅड. बाबासाहेब ननावरे यांनी पाठपुरावा केला. सहायक पोलिस निरीक्षक भूषण सोनार तपास करत आहेत.
सात लाख रुपये उकळले
नाशिक व उज्जैन या ठिकाणी होमहवन करण्यासाठी सात लाख रुपये उकळले. बीड येथील संजय साहेबराव झेंडे यांनाही भोंदूबाबाने पितृदोष सांगितला होता. त्यांच्याकडून पूजेसाठी २१ हजार रुपये घेऊन अधिक दोन लाख रुपयांची मागणी केली होती.