

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
पक्षाची तळागाळातील संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने गोवा फॉरवर्ड पक्षाने राज्यातील १० मतदारसंघांसाठी ब्लॉक अध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली. पक्षाचे संयुक्त सचिव विकास भगत यांनी ही माहिती देताना सांगितले की, पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांनी संघटनात्मक पुनर्रचनेच्या पहिल्या टप्प्यात या नियुक्त्या केल्या आहेत.
यावेळी पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांनी नव्याने नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी आणि जनतेशी अधिक सुसंवाद निर्माण करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.
पारदर्शक, प्रगतिशील आणि जनहिताला प्राधान्य देणाऱ्या गोव्याच्या निर्मितीसाठी पक्षाचे कार्य अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांवर सरदेसाई यांनी सांगितले. असल्याचेही विकास भगत यांनी बोलताना, उर्वरित मतदारसंघांसाठीही लवकरच ब्लॉक अध्यक्षांची नियुक्ती जाहीर करण्यात येणार आहे.
तसेच पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराचा भाग म्हणून महिला आणि युवकांसाठी स्वतंत्र समित्यांची स्थापना केली जाणार असून, त्यामुळे पक्षामध्ये व्यापक प्रतिनिधित्व आणि तळागाळातील सहभागाला अधिक चालना मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नियुक्त झालेले पदाधिकारी
नव्याने नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये राम चंद्रकांत नागवेकर (मांद्रे), प्रशांत मनोहर घोडगे (पेडणे), कृष्णा ऊर्फ विक्रम मुळी परब (कुंभारजुवे), समरेश सदानंद वैगणकर (मये), विशाल गावकर (शिरोडा), नीलेश महादेव नावेळकर (मुरगाव), लुईस कायतानो क्वाड्रोस (कुर्टोरी), पीटर पास्कल फर्नांडिस (फातोर्डा), संतोष सोनू गावकर (सांगे) आणि दत्ता ऊर्फ पांडुरंग गावकर (काणकोण) यांचा समावेश आहे.