

देवळाली कॅम्प (नाशिक) : सुधाकर गोडसे
गेल्या पंचवीस वर्षापासून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीवर सत्ताधीश असलेल्या शिवसेनेला अतिआत्मविश्वास नडला. विरोधकांनी करंजकर विरोधकांची मोट एकत्र बांधत त्याचे रूपांतर विजयात करण्यास खेळलेली रणनीती यशस्वी झाल्याने भगूरकरांनी आत्मविश्वासाने केलेला बदल गावाच्या विकासातून दिसणे यातच गावाचे भले आहे. गेल्या आठ वर्षात भगूरमध्ये मोठ्या संख्येने युवकांचे मतदान नोंदवले गेले. ते मतदान खऱ्या अर्थाने या निवडणुकीत निर्णायक ठरले.
भगूर नगरपालिकेने अनेक चढउतार बघितले आहे. कधीकाळी वीज बिल भरण्याची परिस्थिती नसणाऱ्या या पालिकेची आजची परिस्थिती कोट्यावधीच्या बजेटच्या रूपाने दिसून येत आहे. 1980 ते 1990 दरम्यान पालिका नाशिक महानगरपालिकेत वर्ग करण्यासाठी येथील राजकारणी प्रयत्न करीत होते. मात्र 1995 मध्ये युतीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असल्याने या गावाचे अस्तित्व कायम राखण्यासाठी तिचे कुठेही विलीनीकरण होऊ दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. नंतर शासनाकडून गावाला होत गेलेली मदत व आज कोट्यावधीचे वाढलेले बजेट हे आर्थिक उन्नतीचे पाऊल दिसत आहे.
गावाचे कार्यक्षेत्र मर्यादित असल्याने उत्पन्नाचे व विकासाचे क्षेत्र देखील मर्यादित आहे. तरी देखील शासन स्वातंत्र्यवीरांच्या नावासाठी गावाला मुक्त हस्ते निधी देते. या निधीचा उपयोग कसा करायचा, हे येथील सत्ताधाऱ्यांच्या हातात असते व याच गोष्टीचा वापर पार पडलेल्या निवडणुकीत दिसून आला. 'काढलेला बाप उडालेला कचरा' हा मुद्दा अतिशय जोरदारपणे मांडण्यात विरोधक यशस्वी झाले. सत्तेतून पायउतार व्हावे लागलेल्या शिवसेनेला आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे.
प्रेरणा बलकवडेंना जिद्दीचे फळ
नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी मागील पंचवार्षिकमध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. मात्र त्यात पराभूत झाल्यानंतर गेल्या आठ वर्षात त्यांनी सतत सामाजिक कामातून आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले. उच्चशिक्षित असल्याने व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांनी जिद्द व मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले. शिवसेनेला पराभूत करण्यासाठी त्यांनी बऱ्याच अगोदर नियोजन सुरू केले होते.
घड्याळाचे काटे फिरलेच
कार्यसम्राट आमदार सरोज अहिरे यांनी भगूरची निवडणूक हातात घेत कोणत्याही परिस्थितीत घड्याळाचे काटे फिरवायचेच, याचा चंग बांधला होता. ज्याप्रमाणे विधानसभेपूर्वी त्यांनी देवळाली ते भगूर या दरम्यानचा रेस्ट कॅम्प रोड तयार करताना महिनाभर या ठिकाणी तळ ठोकला त्याच पद्धतीने भगूरच्या निवडणुकीत पंधरा दिवस या गावासाठी दिले.
भाजपचा शिरकाव
भाजपला मागील निवडणुकीत भोपळाही फोडता आला नव्हता. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या मदतीने शिरकाव करण्याचा प्रयत्न केला व तो बऱ्याच अंशी यशस्वी झाला. शिवसेना उबाठा गटाची अवस्था अतिशय वाईट झालेली असताना मागील निवडणुकीतील 16 पैकी 15 नगरसेवक पक्ष सोडून गेलेले असताना काकासाहेब देशमुख यांनी एकखांबी तंबू ठोकला. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जिद्दीने लढले. परंतु नगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढवण्याची क्षमता या पक्षात राहिलेली नव्हती जिल्हा नेत्यांनीही त्याबाबत विचार केला नाही. त्यामुळे देशमुख यांनी शिंदे गटाला विरोध करताना थेट अजित पवार व भाजपशी युती केली. त्यात त्यांना नाहीपेक्षा बरे यश मिळाले स्वतः काका देशमुख व त्यांच्या पत्नी जयश्री देशमुख हे विजयी झाले. त्यामुळे या पक्षाची इज्जत वाचली. काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाची येथील कामगिरी शून्य राहिली.
शिवसेनेतून दीपक बलकवडे हे हुकमी नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्यानंतर शिंदे गटासाठी तो धोका होता. भाजपने त्यांच्यासह त्यांच्या पत्नी विद्या यांनाही उमेदवारी देऊन आपली जागा निश्चित केली होती. त्यामुळेच हे दोघेही पती-पत्नी विजयी झाले. नगराध्यक्ष पदाच्या प्रेरणा बलकवडे व त्यांचे पती विशाल बलकवडे हे देखील विजयी झाले. त्यामुळे भगूर नगरपालिकेत तीन दापद्य एकाच वेळेस नगरसेवक होण्याचा पहिलाच प्रसंग आहे.
सासऱ्यांचा वारसा
प्रेरणा बलकवडे यांचे सासरे ॲड. गोरखनाथ बलकवडे हे देखील भगूर नगरपालिकेत नगराध्यक्ष होते. त्यांच्यानंतर आता हा वारसा त्यांच्या सुनेने व मुलगा यांनी पुढे चालविला आहे. शिंदे गटाकडे उमेदवारांचा मोठा भरणा होता त्यामुळे त्यांनी प्रथमपासूनच एकला चलोची भूमिका घेतली होती. गावाचा केलेला विकास व कार्यकर्त्यांचे मोठे बळ या जोरावर ही निवडणूक आपण सहज जिंकून जाऊ, असा विश्वास शिंदे गटाचे उपनेते विजय करंजकर यांना होता. मात्र हाच अति आत्मविश्वास त्यांना नडला. ज्या ज्या प्रभागात त्यांनी मोठ्या विश्वासाने उमेदवारी दिल्या त्या त्या प्रभागात नगराध्यक्ष पदाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता अनेक ठिकाणी त्यांच्या नगरसेवकांना मिळालेली मते व त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनिता करंजकर यांना मिळालेली मते यातून सर्व काही दिसून येते. याशिवाय अपक्ष लढलेल्या बागडे परिवारातील उमेदवारांनी घेतलेली मते ही लक्षणीय ठरली आहे. या सर्व घडामोडीत दुर्लक्षित असलेल्या वंचित बहुजन आघाडीने अजय वाहने यांच्या माध्यमातून एकमेव जागा लढवली व ती देखील त्यांनी कोणताही गाजावाजा न करता आजवर केलेल्या कामाच्या जोरावर यशस्वी करून सावरकर नगरीत वंचितचा शिरकाव केला आहे.
भाजपचे मंडल अध्यक्ष प्रसाद आडके यांनी मागील निवडणुकीत झालेला पराभव विसरून नव्याने भरारी घेत पालिकेत प्रवेश केला आहे. कधी नव्हे ते भाजपचे तब्बल सहा नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष निवडून आला असला तरी त्यांच्या पक्षाचे तीनच नगरसेवक विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या नगराध्यक्षा पराभूत झाल्या असल्या तरी त्यांचे 8 नगरसेवक विजयी झाले आहेत.
माजी नगरसेवकांना फटका
यंदाच्या निवडणुकीत दहा माजी नगरसेवकांनी निवडणूक लढवली त्यात काका देशमुख, जयश्री देशमुख हे उबाठा तर सुदेश वालझाडे, मनीषा कस्तुरे हे शिवसेना तर दीपक बलकवडे हे भाजपकडून विजयी झाले तर माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीच्या उमेदवार भारती साळवे शिवसेनेच्या प्रतिभा घुमरे, संजय पवार, स्वाती झुटे, शरद उबाळे यांना पराभवाला सामोरे जावे लागले, प्रभाग आठ मधील महिला गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लता रामदास थापेकर या स्वामी समर्थ केंद्राच्या सेवेकरी विजयी झाल्यानंतर आपण बंधू कै. मोहन करंजकर यांच्याप्रमाणे जनसेवेचे काम करणार असल्याचे जाहीर केले.
विकास हाच अजेंडा: आहेर
आ. सरोज आहेर यांनी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व मंत्री शंभूराज देसाई यांना विकास कामांसाठी पाचरण करणार असल्याचे सांगताना आम्ही कोणालाही डावणार नसून भगूरचा विकास हाच अजिंठा राहणार असल्याचे सांगितले.