नाशिक : …तर शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन

नाशिक : …तर शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – देशातील सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असलेल्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला मराठा समाजाने भरभरून मते दिली आहेत. आता त्यांनी स्वत: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील सर्वच प्रमुख नेत्यांना संघटित करून आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर तोडगा काढावा. तसेच नवनिर्वाचित खासदार आणि आमदारांनी स्वत: आंतरवली सराटी येथे जाऊन जरांगे यांना लेटर पॅडवर आरक्षणाच्या पाठिंब्याचे पत्र द्यावे, अन्यथा मराठा समाज खासदार, आमदारांच्या घरासमोर आंदोलन करेल. त्याची सुरुवात बारामती येथून शरद पवार यांच्या घरासमोरील आंदोलनाने होईल, असा इशारा जिल्ह्यातील सकल मराठा समाजाकडून देण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून जरांगे- पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषण करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामध्ये नवनिर्वाचित खासदार तसेच आमदारांनी पाठिब्यांचे पत्र देताना केंद्र आणि सरकारकडे आरक्षणासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्याप्रमाणे मविआतील घटक पक्षांना न्याय देण्यासाठी मोठ्या भावाची भूमिका घेतली, तशीच भूमिका त्यांंनी मराठा आरक्षणाबाबत घ्यावी. मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवार यांनी स्वत: नेतृत्व करीत, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, प्रहारचे बच्चू कडू या सर्वांचे संघटन करून त्यांना आंतरवली सराटी येथे घेऊन जावे. तसेच मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित करून मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, मराठा तुमचे ऋण आयुष्यभर विसरणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाकडून घेण्यात आली.

नाशिक : मराठा आरक्षणप्रश्नी मराठा समाजाची भूमिका मांडताना करण गायकर, विलास पांगारकर, काका पवार, नवनाथ शिंदे, वैभव दळवी, अण्णा खाडे, सचिन पवार, विलास जाधव, विलास गायधनी, दिनेश नरवडे आदी.
नाशिक : मराठा आरक्षणप्रश्नी मराठा समाजाची भूमिका मांडताना करण गायकर, विलास पांगारकर, काका पवार, नवनाथ शिंदे, वैभव दळवी, अण्णा खाडे, सचिन पवार, विलास जाधव, विलास गायधनी, दिनेश नरवडे आदी.

तसेच खासदार, आमदारांनीदेखील आरक्षणप्रश्नी सभागृहात आवाज उठविणार असल्याबाबतची भूमिका जाहीर करावी. अन्यथा खासदार, आमदारांसह नेत्यांच्या घरासमोर आंदोलन केले जाईल. याची सुरुवात बारामती येथील शरद पवार यांच्या घरापासूून केली जाईल, असा इशाराही यावेळी मराठा समाजाकडून देण्यात आला. याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर, विलास पांगारकर, काका पवार, नवनाथ शिंदे, वैभव दळवी, अण्णा खाडे, सचिन पवार, विलास जाधव, विलास गायधनी, दिनेश नरवडे आदी उपस्थित होते.

या आहेत मागण्या

  • मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षण द्यावे.
  • सगेसोयरे हा जीआर कायदेशीर मान्य करून त्याची अंमलबजावणी करावी.
  • मराठा समाजाच्या कुणबी नोंदी असलेल्यांना त्या सर्वांना कुणबीचे प्रमाणपत्र द्यावे.
  • आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनांत समाजावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत.

चार दिवसांपासून जरांगे-पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे आरक्षणावर तत्काळ तोडगा काढायला हवा. आम्ही आणखी दोन दिवस वाट बघणार आहोत. दोन दिवसांनंतरही काहीच तोडगा न काढल्यास, मराठा समाजाची बैठक घेऊन शरद पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला जाईल. – करण गायकर, राज्य समन्वयक, मराठा क्रांंती मोर्चा.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news