Nashik Airport : दररोज १२ फ्लाइट; ९६० प्रवासी, २८ लाखांची उलाढाल

Nashik Airport,www.pudhari.news
Nashik Airport,www.pudhari.news
Published on
Updated on

येथील विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा सुरू करणाऱ्या सर्वच कंपन्या फायद्यात राहिल्या असल्या, तरी राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे या कंपन्यांना टिकवून ठेवण्यात नाशिककर अपयशी ठरले आहेत. सद्यस्थितीत नाशिकच्या ओझर विमानतळावरून इंडिगो या एकाच कंपनीची पाच शहरांना जोडणारी सेवा सुरू असून, दररोज १२ फ्लाइटची ये-जा सुरू आहे. यातून दररोज सरासरी ९६० प्रवासी विमानसेवेचा लाभ घेत असून, रोजची उलाढाल सुमारे २८ लाखांहून अधिक आहे. मात्र एकाच कंपनीची ही सेवा असल्याने प्रवासी प्रतिसादाच्या तुलनेत ती अपुरी पडत आहे. त्यामुळे इतर कंपन्यांनीही सेवा सुरू करण्याची मागणी नाशिककरांकडून केली जात आहे.

काही दिवसांपूर्वीच इंडिगो कंपनीचे सीईओ पीटर एल्बर्स नाशिक दौऱ्यावर असताना, त्यांनी नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू करण्याबरोबरच इतर शहरांनाही जोडण्याचा मनोदय बोलून दाखविला होता. तसेच सध्यस्थितीत एका फ्लाइटमध्ये सरासरी ८० प्रवासी प्रवास करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. सध्या नाशिकहून गोवा, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, इंदूर या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू आहे. या शहरांमध्ये दररोज १२ फ्लाइटची ये-जा सुरू आहे. म्हणजेच ८० प्रमाणे ९६० प्रवाशांचा रोजचा प्रवास आहे. सरासरी तीन हजारांच्या आसपास तिकीटदर विचारात घेतल्यास रोजची उलाढाल २८ लाखांहून अधिक आहे. एकूणच नाशिककरांकडून विमानसेवेला भरभरून प्रतिसाद दिला जात असून, इतरही शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याची गरज आहे. दरम्यान, यापूर्वी नाशिक विमानतळावरून केंद्र सरकारच्या उडान योजने अंतर्गत स्पाइस जेट, एअर अलायन्स, स्टार एअरवेज या कंपन्यांनी वेगवेगळ्या शहरांना जोडणारी सेवा सुरू केली होती. कंपन्याची सेवा नफ्यात होती. मात्र, अशातही अचानकच एकापाठोपाठ एक कंपन्यांनी सेवा बंद केली.

या शहरांना जोडले गेले नाशिक

इंडिगो कंपनीकडून सध्या पाच शहरांना थेट जोडणारी सेवा सुरू आहे. मात्र, कंपनीच्या नव्या शेड्यूलनुसार अहमदाबाद, नॉर्थ गोवा, इंदूर, हैदराबाद, नागपूर, अमृतसर, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंडिगड, चेन्नई, कोइमतूर, डेहराडून, दिल्ली, जयपूर, कोची, कोलकाता, कोझिकोड, लखनौ, मेंगलुरू, रायपूर, राजमुंद्री, रांची, तिरुअनंतपूरम, तिरुपती, उदयपूर, वाराणसी, विशाखापट्टणम, विजयवाडा या शहरांना होपिंग फ्लाइटने जोडता येत आहे.

नव्या वर्षांत चार नव्या कंपन्या

नाशिक विमानतळावरून सध्या इंडिगोकडून सेवा दिली जात असून, नव्या वर्षात चार नव्या कंपन्या नाशिकमधून आपली उड्डाणे सुरू करणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. सध्या या कंपन्यांशी बोलणी सुरू असून, मार्च २०२४ पासून या कंपन्यांकडून सेवा सुरू केली जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास नाशिक देशातील आणखी शहरांना जोडले जाणार आहे.

नाशिक-दिल्ली विमानसेवेची प्रतीक्षा

नाशिकहून दिल्ली गाठणाऱ्यांची संख्या अधिक असून ही सेवा त्वरित सुरू करावी, अशी अनेकांची मागणी आहे. इंडिगो कंपनी त्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, टाइम स्लॉट मिळत नसल्याने ही सेवा अद्यापही सुरू झाली नाही. स्पाइस जेटकडून नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू होती. मात्र, ती बंद पडल्याने नाशिककरांचे मोठे हाल होत आहेत.

आतापर्यंत नाशिककरांनी विमानसेवेला चांगला प्रतिसाद दिला असून, इतर शहरांनाही जोडणारी सेवा सुरू व्हावी अशी मागणी सातत्याने व्यापार, उद्योग क्षेत्रातून केली जात आहे. सध्या काही कंपन्यांशी बोलणी सुरू असून, नव्या वर्षात नाशिककरांना गुड न्यूज मिळेल, अशी अपेक्षा आहे.

– मनीष रावल, अध्यक्ष, एव्हिएशन कमिटी, नाशिक

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news