

नांदगाव : नांदगाव–येवला मार्गावरील दहेगाव फाट्याजवळ दोन दुचाकींच्या भीषण धडकेत मोरझर येथील 65 वर्षीय शेतकरी कचरू लक्ष्मण निकम यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. 24) रात्री उशिरा घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कचरू निकम हे आपल्या एमएच 41 ए डी 486 क्रमांकाच्या दुचाकीवरून नांदगाव येथे बाजार करून गावाकडे परतत होते. रात्री सुमारे 10.15 वाजण्याच्या सुमारास दहेगाव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
या अपघातात निकम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिक व त्यांचे नातू समाधान वाल्मिक गायके यांनी तत्काळ त्यांना खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय, नांदगाव येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरी यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, या घटनेची नोंद नांदगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.