

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भोंदू अशोक खरात सध्या कारागृहात असला तरी त्याच्या मालकीच्या जमिनींच्या पार्श्वभूमीवर एक वेगळेच चित्र समोर येत आहे. शहर परिसरातील त्याच्या बहुतांश जमिनी या प्रस्तावित रिंगरोड प्रकल्पाच्या हद्दीत येत असल्याची माहिती समोर आली असून, भविष्यात या जमिनींना प्रचंड आर्थिक मूल्य मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे जेलमध्ये असूनही खरात कोट्यधीश होणार आहे. नाशिक शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि रिंगरोडसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे आसपासच्या जमिनींचे दर गगनाला भिडत आहेत. अशा परिस्थितीत खरातने पूर्वी खरेदी केलेल्या जमिनी आता सुवर्णसंधी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, या जमिनींची खरेदी करताना त्याला शासकीय विभागातील काही अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळाल्याची चर्चा असून, या प्रक्रियेत यंत्रणेची अप्रत्यक्ष मदत झाल्याचेही बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिंगरोडच्या विस्तारणाऱ्या आराखड्यामुळे या जमिनींच्या किमतीत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे सध्या कारागृहात असलेल्या खरातला भविष्यात कोट्यवधी रुपयांचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर 'जेलमध्ये असतानाही संपत्ती वाढत आहे' अशी चर्चा स्थानिक पातळीवर रंगू लागली आहे. या व्यवहारांमुळे शासकीय यंत्रणेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जमिनींच्या खरेदी-विक्री प्रक्रियेत अधिकाऱ्यांचा सहभाग किंवा सल्ला यामुळे पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
भविष्यात या सर्व व्यवहारांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे गंभीर गुन्ह्यांच्या आरोपांना सामोरे जात असताना दुसरीकडे रिंगरोडमुळे वाढणाऱ्या जमिनींच्या किमतीमुळे खरातच्या संपत्तीचे गणित बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आर्थिक आणि प्रशासकीय पैलूही तितक्याच गांभीर्यान तपासले जाण्याची गरज व्यक्त केली जात आहे.