नाशिक : 'लाईव्ह मॉडेल' समोर बसवून चित्रकार अमित ढाणे यांनी जलरंगात साकारलेले हुबेहुब आणि जिवंत व्यक्तीचित्रण आणि ज्येष्ठ चित्रकार मंडलिक यांच्या मूर्त आणि अमूर्त शैलीतील कलाकृतील बारकावे, त्यातील सौंदर्य स्थळे आणि दृश्यकलावंतानी विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद टॉक शो, स्लाईड शो, चर्चासत्रांमधून 'नाशिक कलानिकतेन' आयोजित वार्षिक 'कला'उत्सव सप्तरंगी झाला.
नाशिक कलानिकेतन चित्रकला महाविद्यालयाचे वार्षिक कलाप्रदर्शन आणि पाचदिवसीय 'रंग' उत्सव शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी सभागृहात सुरु आहे. महोत्सवात ज्येष्ठ चित्रकार रवी मंडलिक यांचा टॉक शो आणि त्यांच्याच कलाकृतींतील सौंदर्यस्थळे, निर्मितीप्रक्रिया यावर आधारित स्लाईड शोला कलारसिकांनी दाद दिली. मूर्त चित्रशैलीतून अमूर्त कलाकृतींचा प्रवास मंडलिक यांनी अत्यंत ओघवत्या भाषेत स्लाईड शोमधून उलगडून दाखवला. अमूर्त शैली चित्रांवर अगम्य आणि दुर्बोधतेचा शिक्का मारला जातो. मात्र त्यातील सर्जनशीलता, अमूर्त आकार, रंगांबद्दल सुरेख विवेचन मंडलिक यांनी केले.
सृष्टीतील पंचतत्व, वायू आणि जल यांच्या आधाराने त्यांनी केलेली कामे, कलाकृती यांचे विवेचन त्यांनी दृकश्राव्य सादरीकरणातून केले. रेडंरिंगपासून स्वातंत्र्य आणि आकारापासून मुक्ती यावर त्यांनी केलेल्या विश्लेषणाने उंची गाठली. दरम्यान, प्रदर्शनात देशभरातील चित्रकर्मींच्या ४००हून अधिक कलाकृती असून, त्यात, व्यक्तीचित्रण, निसर्ग, अमूर्त, कंपोझिशन आदी शैलीतील चित्रे रसिकांवर मोहिनी घालत आहे. यावेळी संस्थाध्यक्ष ॲड. अविनाश भिडे, दि. ल. जानमाळी, प्राचार्य संजय साबळे आदी उपस्थित हाेते.
रंग महोत्सवात दुसऱ्या सत्रात युवा चित्रकर्मी ढाणे यांनी जलरंगातून व्यक्तीचित्रण करुन उपस्थितांची वाहवा मिळवली. जलरंग माध्यम व्यक्तीचित्रणात आव्हानात्मक मानले जाते. यात शुभ्र रंगांसाठी कसलेला आणि कंट्रोल्ड ब्रश किमया करतो. ढाणे यांनी आपल्या संयमी कुंचल्यातून अॅड. भिडे यांना समोर बसवून व्यक्तीचित्रण केले. चित्र पूर्ण हाेतात उपस्थितांमधून वाह. अप्रतिम.! प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर..! अशी उत्स्फूर्त दाद त्यांच्या कलाकृतीला मिळली.