नाशिक : निल कुलकर्णी
नाशिक कलानिकेतन चित्रकला महाविद्यालय आयोजित ८० वे वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन गेडाम यांच्या हस्ते शनिवारी (दि. ८) करण्यात आले. व्यासपीठावर कला संचालक डॉ. संतोष क्षीरसागर, प्रसिद्ध चित्रकर्मी रवी मंडलिक, संस्थाध्यक्ष ॲड. अविनाश भिडे, दि. ल. जानमाळी, प्राचार्य संजय साबळे उपस्थित होते. शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पुण्याचे अष्टपैलू चित्रकार अमित ढाणे यांना पहिला कलामहर्षी वा. गो. कुलकर्णी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
नाशिक कलानिकेतन चित्रकला महाविद्यालयातर्फे दिला जाणार पहिला चित्रमहर्षी वा. गो. कुलकर्णी पुरस्कार यंदा अमित ढाणे यांना मिळाला. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद.
विविध माध्यमांतून चित्र रंगवण्याचे कसब कसे साधता?
देशाला विविध माध्यमांतून चित्र काढणाऱ्यांची परंपरा आहे. ज्येष्ठ चित्रकर्मी, 'मास्टर्स' यांची चित्रे, अभ्यासतो. प्रत्येक माध्यमांची वेगवेगळी बलस्थाने आहेत. विद्यार्थिदशेत कामासाठी जलरंग साहित्य हलके, बाळगायला सुलभ जात. त्यामुळे जलरंगातून अधिक कामे केली. त्यातच रस वाढला. बहुविध माध्यमातून कलाकृती साकारताना आनंद मिळत गेला.
उपयोजित कला शिक्षण ललित कलेकडे कसे घेऊन आले?
सर्व कला परस्परांशी सुसंवाद साधतात. त्या एकमेकांना छेदून जात नाही तर परस्परपूरकच! 'कमर्शिअल आर्ट'ने कामातील, राहणीमानातील, व्यवस्थितपणाची शिस्त, दृष्टी दिली. ललित कलेत ती कामी येते. चंद्रकांत मांढरे यांचे एक पुस्तक बालपणी वाचले. त्यात ते सुटाबुटात एक निसर्गचित्र रेखाटतानाचा फोटो पाहिला. चित्रकार किती नीटनेटका, व्यवस्थित राहून समाजावर प्रभाव टाकू शकतो याचा पहिला पाठ त्यातून मिळाला.
तुमच्या व्यक्तिचित्रात शरीरशास्त्राचा सखोल अभ्यास दिसतो?
अंजिठा, वेरुळची चित्र, शिल्प थक्क करणारी आहे. ही चित्र, शिल्प अलौकिक, अद्भुत आहेत. त्याकाळात त्या कलाकारांनी हे कसे साध्य केले असेल हा विचार अस्वस्थ करतो. मानवी शरीरशास्त्राचा अभ्यास, त्वचेचे रंग-पॅलटमधून तयार करण्याचा सराव, पाश्चत्य चित्रकारांच्या 'ॲनाटाॅमी'च्या शैलीचा अभ्यास करून स्वतंत्र शैली विकसित करण्याचा प्रयत्न करतोय.
उदयोन्मुख चित्रकारांसाठी काही संदेश ?
हल्ली विद्यार्थ्यांची 'लाइव्ह मॉडेल'वरून व्यक्तिचित्रण कमी करतात. चित्रांसाठी बैठकही कमी झाली. फोटोला 'झूम' करून व्यक्तिचित्रे रंगवली जातात. यातून चित्रात जिवंतपणा हरवला. 'लाइव्ह मॉडेल'वरून केलेल्या कामात त्वचेचा रंग, 'प्रस्पेक्टिव्ह' छाया- प्रकाश, शरीररचना थेट डोळ्यांनी दिसते तशी ती फोटो 'झूम' केल्यास बदलते.
पुरस्कार मिळल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय होती?
चित्रमहर्षी कुलकर्णी सरांनी चित्रकारितेत अनेक पिढ्या घडवल्या. त्यांच्या नावाचा पहिला पुरस्कार मिळाला हे कळताच धन्य झालो, शब्दही सुचत नव्हते. पहिल्यांदा कृतकृत्येचा, अत्यानंदाचा क्षण अनुभवला. हा पुरस्कार नसून कलेतील ऋषी, चित्रमहर्षींचा आशीर्वाद आहे, असे मानतो.

