नाशिक : कला आणि संस्कृती समाजाला वैचारिक बांधणी देते. मानवी जीवनातील अंग, त्यातील जीवंतपणा आणि विविध रंग कलेतून अभिव्यक्त होतात. कलेमुळे समाजाची जडणघडण करण्यासह आकार, विचार आणि जीवंतपणा देते, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.
नाशिक कलानिकेतन चित्रकला महाविद्यालय आयोजित ८० वे वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन गेडाम यांच्या हस्ते शनिवारी (दि. ८) करण्यात आले. व्यासपीठावर कला संचालक डॉ. संतोष क्षीरसागर, प्रसिद्ध चित्रकर्मी रवी मंडलिक, संस्थाध्यक्ष ॲड. अविनाश भिडे, दि. ल. जानमाळी, प्राचार्य संजय साबळे उपस्थित होते. शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पुण्याचे अष्टपैलू चित्रकार अमित ढाणे यांना पहिला कलामहर्षी वा. गो. कुलकर्णी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, ११ हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे पुरस्कारचे स्वरुप होते.
डॉ. गेडाम यांनी संस्थेच्या ८० वर्षांच्या वाटचालीबद्दल कौतुकोद्गार काढले. ते म्हणाले, कला जगवणे, ती वाढवणे आणि नवीन कलाकारांना घडवणे खूप अाव्हानात्मक कार्य आहे. नाशिक कलानिकेतन आव्हाने, अडचणींवर मात करून कलावंत घडवण्याचे व संस्कृती जोपण्याचे काम अविरतपणे करत आहे. कलाविद्यार्थ्यांनी आगामी नाशिक कुंभमेळ्यात शहराला कलेतून समृद्ध करावे, अशी अपेक्षाही त्यांंनी व्यक्त केली. प्रारंभी दिनकर जानमाळी यांनी प्रास्ताविक केले. संध्या केळकर यांनी सूत्रसंचालन केले.
संगीत, नाट्य, नृत्य अशा आविष्कृत कला थेट व प्रत्यक्ष रंजन करतात तर दृश्य कला अप्रत्यक्षपणे रसिक रंजन करतात, असे सांगून डॉ. क्षीरसागर म्हणाले, कलेतून तत्वचिंतन, अध्यात्म आणि रंजन हे तिन्ही गोष्टी साध्य होतात. चित्रकर्मी मंडलिक यांनी नाशिकमध्ये होणारा कुंभमेळा दृश्यकलावंताना मोठी संधी असल्याचे सांगून त्यातून कलाअभिव्यक्ती साधण्याचे आवाहन केले.
यंदाचा जीवनगौरव पुरस्काराने प्रख्यात ज्येष्ठ हास्य व्यंगचित्रकार शी. द. फडणीस यांना सन्मानित करण्यात आले. प्रकृती अस्वस्थामुळे पुणे येथे त्यांच्या घरी जाऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ व मानपत्र आणि रोख २५ हजार असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप होते.