

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्यांवर भाष्य करत असताना त्यांना लाडकी बहीण योजनेबाबतही प्रश्न करण्यात आले होते. लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना 2100 रुपये कधी मिळणार, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर झिरवळ यांनी थेट उत्तर दिले. 'लाडक्या बहिणीं'ना 2100 रुपये देऊ, असे कुणीच म्हटले नाही', असे सांगत घूमजाव केल्यानंतर माघार घैतली आहे.
राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्ट भूमिका मांडली." या योजनेत 2100 रुपये देण्याचे कोणतेही आश्वासन सरकारने दिलेले नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली होती. त्यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले की, "यापूर्वी विरोधक असा दावा करत होते की सरकार 1500 रुपये देखील देणार नाही. मात्र, सरकारने पंधराशे रुपये दिल्यावर विरोधक आता 2100 रुपयांचा मुद्दा उचलून धरत असल्याचे त्यांनी म्हटले. ते म्हणाले, "माझ्या मते 1500 रुपयांची रक्कमही पुरेशी असून महिला या मिळणाऱ्या मानधनामध्ये आनंदी असल्याचा दावा झिरवळ यांनी केला. पण त्यानंतर 2100 रुपये देण्यावरुन त्यांनी घुमजाव केल्याने झिरवाळ हे टिकेचे धनी झाले.
2100 रुपये कधी मिळणार याची लाडक्या बहिणांना प्रतीक्षा असतानाच राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी 'लाडक्या बहिणीं'ना 2100 रुपये देऊ, असे कुणीच म्हटले नाही', असे सांगत घूमजाव केला होता. त्यानंतर टिका झाल्याने मंत्री झिरवाळ यांनी माघार घेत सरकारची आर्थिक परिस्थिती नाजूक असून लवकरच आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना सुधारीत मानधन देऊ असं त्यांनी आता म्हटलं आहे.