

मालेगाव : प्रमोद सावंत
इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेम्बली महाराष्ट्र (इस्लाम) पार्टीचे संस्थापक माजी आमदार आसिफ शेख सातत्याने प्रक्षोभक वक्तव्य करून खळबळ उडवून देत आहेत. मागील महिन्यात मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या उत्तर महाराष्ट्र मेळाव्यात त्यांनी औरंगजेबचे गुणगाण गायले होते. हा वाद शमतो न शमतो, तोच त्यांनी, नागपूर दंगलीचा मास्टर माइंड फईम खान हा समाजसेवक असल्याचे वादग्रस्त वक्तव्य शुक्रवारी (दि. 11) झालेल्या इस्लाम पार्टी सभेत केले. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांची ही वक्तव्ये जाणूनबुजून व महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्तेसाठीचे बीजारोपण असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याच वेळी राज्य पातळीवरील मुस्लीम नेत्यांचे लक्ष वेधले जावे, असाही त्यामागे हेतू आहे.
माजी आमदार शेख यांनी असे वादग्रस्त वक्तव्य करताच स्थानिक पातळीवरील हिंदुत्ववादी संघटना, भाजप व सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आंदोलन करतात. यामुळे मुस्लीमबहुल असलेल्या मालेगाव बाह्य मतदारसंघात आपली प्रतिमा उजळेल, मुस्लिमांचा कैवारी अशी होईल, अशी भावना त्यांची आहे. त्याला शेख यांचे पदाधिकारी व कार्यकर्तेही खतपाणी घालतात. विधानसभा निवडणुकीत अवघ्या 162 मतांनी झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. विधानसभा तर हातची गेली. आता महापालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी काहीपण, अशीच जणू काही त्यांची भूमिका आहे.
प्रत्यक्ष आमदार नसताना जेवढे ते कार्यतत्पर नव्हते, तेवढे सध्या झाल्याचे जुने जाणते कार्यकर्ते सांगतात. शहरातील अल्पसंख्याकांचा कुठलाही प्रश्न व समस्या असो, शेख व समाजवादी पक्षाचे मुस्तकीम डिग्निटी त्यात आघाडीवर असतात. यातून आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांचे खच्चीकरण करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. त्यामुळे तूर्त पूर्व भागात या दोघांची प्रतिमा सुधारली आहे. जाणकारांच्या मते महापालिका निवडणुकीत या दोघांची युती झाल्यास नवल वाटू नये. हे नवे राजकीय समीकरण आमदार मौलाना मुफ्ती यांना महापालिकेत मात देऊ शकेल, अशी सध्याची स्थिती आहे. हा टेम्पो डिसेंबर अखेरपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी या सर्व युक्त्या सुरू आहेत, असे म्हटले जाते.
याउलट पश्चिम भागातील शिवसेना वगळता अन्य पक्ष गटबाजीने पोखरलेले आहेत. अशा पद्धतीची वादग्रस्त वक्तव्ये झाल्यास हिंदुत्वाच्या नावाने सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येतात. आंदोलने होतात. त्यामुळे पश्चिम भागातील पक्ष संघटनांसाठीही ही वक्तव्ये फायदेशीरच आहेत. काही अल्पसंख्याक जाणकार हे, माजी आमदार शेख हे भाजपची स्क्रिप्ट वाचतात, असाही आरोप करतात. आरोप- प्रत्यारोपांची राळ व पातळी काहीही असते. मतांचे धु्रवीकरण करण्यास हे हातखंडे यशस्वी होत आहेत. नाही तरी एरवी येथील महापालिका निवडणुका या विकासाच्या मुद्द्याऐवजी प्रचारात अशा भरकटलेल्या व बिनकामाच्या मुद्द्यांवरच लढविल्या जातात. यातूनच प्रसंगी मुद्द्यांवरची लढाई हातघाईवर येते. वर्षानुवर्षे हेच सुरू आहे. यामुळेच की काय, गेल्या पाच वर्षांत कुठलेही उल्लेखनीय एकही काम न करता आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. त्यामुळेच शेख यांनीदेखील अल्पसंख्याक बांधवांना चुचकारीत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच शहरात केंद्राच्या तिहेरी तलाक, एनआरसी, सीएए व आता वक्फ या निर्णयांवर राळ उठविली जात आहे. मशिदीवरील भोंगे, मदरसे, उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळावर चालणारे बुलडोझर आदी राज्य पातळीवरील मुद्देही त्यांच्या कामी येत आहेत. शेख यांच्या जोडीला यापूर्वीच या पद्धतीने राजकारण करण्यात माहीर असलेल्या शानेहिंद निहाल अहमद व त्यांचे पती मुस्तकीम डिग्निटी या दाम्पत्याची साथ मिळाली आहे. एकेकाळचे कट्टर विरोधक हातात हात व गळ्यात गळा घालून काम करीत आहेत. त्यामागील इंगित ओळखू येऊ नये इतके येथील मतदार निश्चितच दुधखुळे नाहीत. ‘कहने वालो का कुछ नही जाता सहने वाले कमाल करते हैं कौन ढुंडे जबाब शहर की तरक्की का लोग तो बस सवाल करते हैं’
राज्य पातळीवर मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. त्याचप्रमाणे येथील महापालिका हा राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. शहरात अन्य स्थानिक स्वराज्य संस्था, बँका, पतसंस्था नसल्याने बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ओढा महापालिका निवडणुकीकडेच असतो त्यामुळेच एकेका प्रभागात चार जागांसाठी प्रत्येक पक्षात किमान 10 ते 12 इच्छुक आहेत. शहराचे राजकारण आजही महापालिका तसेच वॉटर, गटर व मीटर यांभोवतीच फिरते. यापूर्वी तत्कालीन नेते रेशन, रॉकेल व रहिवाशांसाठी निवास- अनधिकृत झोपडपट्ट्या, अतिक्रमण यांभोवती राजकारण करीत. रॉकेल बंद झाल्याने तसेच शासनाचा शिधा मुबलक मिळत असल्याने त्यात थोडा फरक पडला आहे. अतिक्रमणाचा मुद्दा अद्यापही मांड ठोकून आहे.