

मालेगाव (नाशिक ) : महानगरपालिका प्रशासनाने कुठलेही कागदपत्रे नसताना एक हजार 44 बोगस जन्मदाखले शहानिशा न करता दिले. यातील अनेकांचा ठावठिकाणा व पुरावा नाही, यामुळे ते बांगलादेशी, रोहिंगे असू शकतात. बनावट प्रमाणपत्र व दाखले बोगस असल्याचे सिद्ध झाले आहे.
चौकशीत आणखी सत्य बाहेर येईल. यातील 40 जण फरार झाले. त्यांचा कुठलाही सुगावा नाही, ही बाब घातक असून, दोषी अधिकार्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.
सोमय्या सोमवारी (दि. 2) मालेगाव महापालिकेत बोगस जन्मदाखल्यासंदर्भात आयुक्त, संबंधित अधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. तसेच किल्ला पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. दोन दिवसांत याप्रकरणी गुन्हा दाखल होईल, असा विश्वास व्यक्त केला.
महानगरपालिका प्रशासनाने कुठलेही कागदपत्र नसताना एक हजार 44 बोगस जन्म दाखले कुठलीही शहानिशा न करता दिले. त्यातील अनेकांचा ठावठिकाणा व पुरावा नाही, त्यामुळे ते बांगलादेशी, रोहिंगे असू शकतात. बनावट प्रमाणपत्र व दाखले बोगस असल्याचे सिद्ध झाले आहे. चौकशीत आणखी सत्य बाहेर येईल. यातील 40 जण फरार झाले आहेत. त्यांचा कुठलाही सुगावा नाही, ही बाब घातक असून, दोषी अधिकार्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. आयुक्तांना निलंबित करावे, अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 2) येथे केली. खासदार सोमय्या यांनी या संदर्भात महापालिकेत आयुक्त, संबंधित अधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर माध्यमांशी बोलताना हा आरोप केला. यानंतर त्यांनी भाजप पदाधिकार्यांसह किल्ला पोलिस ठाणे गाठत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दोन दिवसांत याप्रकरणी गुन्हा दाखल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मनपामध्ये झालेल्या बैठकीस आयुक्त रवींद्र जाधव, तहसीलदार विशाल सोनवणे, गट विकास अधिकारी चंद्रकांत साबळे, आरोग्याधिकारी डॉ. जयश्री आहेर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. नीलेश कचवे, शहराध्यक्ष देवा पाटील, संदीप भुसे, दादा जाधव, श्याम देवरे, भाग्येश कासार आदी उपस्थित होते.
खासदार सोमय्या यांनी घुसखोर बांगलादेशी, रोहिंग्या, बनावट जन्म दाखले या विषयांचा सातत्याने पाठपुरावा करीत मालेगाव शहराला भेट देण्याचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. ते प्रत्येक दौर्यात नवनवीन प्रकरणे बाहेर काढत आहेत. जन्मदाखला घोटाळाप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात यापूर्वीच तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नव्याने सोमय्या यांनी किल्ला पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आतापर्यंत जन्म दाखले प्रकरणात जन्म- मृत्यू विभागातील लिपिकाविरोधात गुन्हा दाखल झाला असला, तरी यास वरिष्ठ अधिकारीही जबाबदार आहेत. त्यांनी याकडे केलेले दुर्लक्ष घातक असल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होणे आवश्यकच आहे. खासदार सोमय्या यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर प्रथमच निदर्शने झाली. किल्ला पोलिसांनी मनपा आवारात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मालेगाव दौर्यात त्यांनी आयुक्त, मनपा अधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर नियंत्रण कक्ष आवारातील कार्यालयात अपर पोलिस अधीक्षक तेगबिरसिंग संधू यांची भेट घेऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनी जन्मदाखला घोटाळा व बांगलादेशी, रोहिंग्या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी दोषी मनपा अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. जन्मदाखला घोटाळ्यात अब्दुल तव्वाब या जन्म- मृत्यू विभागातील लिपिकासह एका महिलेवर गुन्हा दाखल झालेला आहे. या उलट पोलिसांच्या आरोपपत्रात शहरात बनावट प्रमाणपत्र आढळले असले, तरी एकही बांगलादेशी, रोहिंग्या आढळल्याचा उल्लेख नाही. अल्पसंख्याक बांधवांना त्रास देण्यासाठी हे सुरू असल्याचा आरोप मायनॉरिटी डिफेन्स कमिटीचे आसिफ शेख, मुस्तकीम डिग्निटी यांनी केला आहे. अशातच सोमय्या यांनी सोमवारच्या दौर्यात 40 जणांचा ठावठिकाणाच नाही, बनावट कागदपत्रे तयार करणार्यांना पाठीशी घालणार्यांची कीव येते, असे सांगत काँग्रेस व उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. खासदार राऊत यांनी रविवारच्या मालेगाव दौर्यात सोमय्या म्हणजे गटार असा उल्लेख केला होता. एकंदरच याप्रश्नी दावे- प्रतिदावे सुरू आहेत.
खासदार किरीट सोमय्या यांना यावेळी मालेगाव दौर्यात प्रथमच विरोध व निषेधाचा सामना करावा लागला. सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे राहील हनीफ, अब्दुला खान, इब्राहिम इन्कलाब, मुश्ताक महाज आदींसह पदाधिकार्यांनी महापालिका प्रवेशद्वारासमोर झेंडे घेऊन ‘सोमय्या गो बॅक’ अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी काही अंतरावरच त्यांना रोखले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर त्यांची सुटका केली.
शहरात रोहिंग्या आणि बांगलादेशी असल्याचा आरोप करून जन्म दाखल्याचा मुद्दा भडकवून मुस्लिमांच्या बदनामीचे कृत्य मालेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. माजी खासदार किरीट सोमय्या हे मुस्लीम भागात जाऊन सरकारी अधिकार्यांवर दबाव आणून मुस्लिमांना टार्गेट करत आहेत. आता हे सर्व सहन केले जाणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा मायनॉरिटी डिफेन्स कमिटीचे आसिफ शेख व मुस्तकीम डिग्निटी यांनी दिला. जन्म दाखलेप्रकरणी महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी सोमय्यांच्या दबावाखाली काम करू नये, असे आवाहन त्यांनी केले. सोमय्या यांच्या महापालिकेतील दौर्यापूर्वीच शेख व डिग्निटी यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन सोमय्या यांच्या दबावाखाली तुम्हाला व नागरिकांना त्रास होईल असे कोणतेही चुकीचे काम करू नये, अशी मागणी केली. शेख म्हणाले की, सोमय्या हे प्रशासनावर दबाव आणत आहेत. त्यांना बेकायदेशीर गोष्टी करण्यास भाग पाडत आहेत. त्यास आमचा विरोध आहे, असे त्यांनी सांगितले.