

लासलगाव (नाशिक) : नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात नाफेड आणि एनसीसीएफमार्फत तब्बल तीन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली होती. मात्र या बफर स्टॉकमधील कांद्याचा साठा मोठ्या प्रमाणावर खराब होऊ लागल्याचे समोर आले आहे. कलकत्ता, गुवाहाटी आणि चेन्नई येथे कांदा पाठवण्यासाठी शासकीय गोडाऊनमधील चाळी उघडण्यात आल्यावर ही धक्कादायक बाब स्पष्ट झाली.
प्रतवारीदरम्यान तब्बल २० ते २५ टक्के कांदा निकृष्ट निघाल्याचे समोर आले आहे. अजूनही उर्वरित चाळी उघडायच्या असल्याने किती कांदा खराब ठरेल याबाबत अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे खरेदी केलेला बफर स्टॉक प्रत्यक्षात किती उपयुक्त ठरणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या साठ्याची देखरेख आणि साठवणुकीची जबाबदारी सहकारी संस्था आणि मंडळांवर सोपविण्यात आली होती. मात्र खराब होणारा साठा, फक्त ६५ टक्के रिकव्हरी साधणे आणि निकृष्ट कांद्याची विल्हेवाट लावणे या कारणांमुळे संस्थांची डोकेदुखी वाढली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खरेदी करून गेलेला कांदा अजून बाजारात विक्रीसाठी आणला जात आहे, मात्र नाफेड-एनसीसीएफकडून शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. उलट हा कांदा बाजारात आल्याने भाव घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही परत मिळवणे कठीण झाले आहे. दसरा-दिवाळीसारख्या सणांसाठी पैशांची निकड असताना कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.