

840 tons of onion left for Chennai from Lasalgaon
लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
लासलगाव रेल्वेस्थानकावर रविवारी (दि. १४) दुपारपासून कांद्याचे रॅक लोडिंग सुरू झाले. तब्बल २१ डब्यांच्या मालगाडीत ८४० टन कांदा भरून हा रॅक चेन्नईकडे रवाना झाला. मात्र, या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हसू हरपले आहे.
केंद्र सरकारमार्फत नाफेड आणि एनसीसीएफद्वारे खरेदी केलेला कांदा देशातील विविध शहरांत स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. ग्राहकांना दिलासा मिळावा यासाठी हा कांदा केवळ २४ रुपये किलो दराने विकला जात आहे.
यापूर्वी कोलकाता आणि गुवाहाटीसाठी रॅक रवाना झाले होते, त्यानंतर आता चेन्नईकडे मोठ्या प्रमाणात कांद्याचा साठा पोहोचवण्यत आला आहे. दरम्यान, या निर्णयाचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर घसरून १००० ते १२०० रुपये क्विंटलपर्यंत खाली आले असून, शेतकऱ्यांना प्रतिकिलोला १० ते १५ रुपये किलो तोट्याने कांदा विकावा लागत असल्याबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.
ग्राहकांना दिलासा मिळतोय हे योग्य. पण, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कांदा दरप्रश्री केंद्र व राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप केला नाही तर मुंबई आणि दिल्ली येथे मंत्रालयांसमोर आंदोलन छेडले जाईल, अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी नोंदवली.