.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमा (एन-कॅप) अंतर्गत महापालिकेने हाती घेतलेल्या प्रकल्पांवर ७५ कोटींचा निधी खर्च झाला आहे. उर्वरित निधीसाठी महापालिका प्रशासनाकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, जोपर्यंत महापालिकेची निवडणूक होऊन लोकनियुक्त महासभेचा ठराव प्राप्त होत नाही तोपर्यंत निधी वितरीत न करण्याची भूमिका शासनाने घेतल्याने एन-कॅप अंतर्गत हाती घेतलेले प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे.
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एन-कॅप) राबविला जात आहे. या योजनेत राज्यातील १९ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत विविध कामांसाठी केंद्र सरकारकडून महापालिकेला ८७ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून महापालिकेने चार यांत्रिकी झाडू, त्र्यंबकरोडवरील जिल्हा रुग्णालय ते पंचायत समिती दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा सायकल ट्रॅक तयार केला आहे.
या योजनेअंतर्गत चार वर्षांत ८७ कोटी रुपये निधी प्राप्त झाला. त्यापैकी जवळपास ८२ टक्के निधी खर्च झाला आहे. एन-कॅप अंतर्गत सिडको व जेल रोड अमरधाममध्ये विद्युतदाहिनी बसविण्याचे काम पुर्ण झाले आहे. पंचवटी अमरधाम मध्ये काम सुरु आहे. शहरात वृक्षलागवड, रस्त्याच्या कडेला हिरवळ लावणे, जलतरण तलाव, स्वच्छतागृहांवर सोलर प्रकल्प बसविणे, इलेक्ट्रिक बस डेपो, चार्जिंग स्टेशन उभारण्याची कामे प्रगतिपथावर आहेत. एन-कॅप अंतर्गत कामे पुर्णत्वास येत असली तरी देयके मात्र अडकली आहेत. देयके अदा करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाला महासभेचा ठराव हवा आहे. गेल्या तीन वर्षांपांसून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने लोकनियुक्त महासभेच्या ठरावाअभावी एन-कॅप निधी रोखून धरण्यात आला आहे.
सिडको, नाशिकरोड अमरधाम मध्ये विद्युत दाहीनी.
बांधकाम कचरा विल्हेवाट प्रकल्प.
चार यांत्रिकी झाडू खरेदी.
सायकल ट्रॅक बनविणे.
२० ठिकाणी ई-चार्जिंग स्टेशन. (सात स्टेशन पुर्ण)
सुलभ शौचालयांवर सोलर रूफटॉप बसविणे.
घंटागाडी पार्किंग स्थळावर सीसीटिव्ही बसविणे.
उद्यान कचरा कंपोस्टींग.
रस्ते दुभाजक, वृक्ष लागवड, हिरवळ.
जलतरण तलावावर सोलर पॅनल बसविणे.
पंचवटी विद्युत दाहीनी.
आडगाव ट्रक टर्मिनल ई-बसेस डेपो.
लाकडावरील आधुनिक दाहीनी.