

नाशिक : राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रम अर्थात एन-कॅप अंतर्गत शहरातील सात विविध ठिकाणी उद्यानांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांवर महापालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागामार्फत सहा हजार ९०० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. ही वृक्षलागवड शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पोषक ठरणार आहे.
वाढत्या प्रदूषणावर मात करून हवेची गुणवत्ता राखण्यासाठी केंद्र शासनाने देशभरातील प्रमुख शहरांमध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून नाशिक शहरातील हवेच्या गुणवत्तेत सुधार करण्यासाठी केंद्र शासनाने महापालिकेला ८७ कोटी रुपयांचा निधी अनुदान स्वरूपात दिला आहे. त्यापैकी ५० कोटींचा निधी महापालिकेने राबविलेल्या विविध उपक्रमांवर खर्च झाला आहे. उर्वरित निधी खर्चाबाबत तसेच झालेली कामे, प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी गेल्या महिन्यात केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. यात निधी सत्वर खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले होते. दरम्यान, हवेच्या गुणवत्तेत सुधार होण्यासाठी वृक्षलागवड हा महत्त्वाचा भाग ठरत असल्याने महापालिकेच्या उद्यान विभागाने शहरातील सात ठिकाणी करावयाच्या वृक्षलागवडीसंदर्भात प्रस्ताव गोदावरी संवर्धन आणि पर्यावरण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्यास उपायुक्त अजित निकत यांनी हिरवा कंदील दिला असून, आता हा प्रस्ताव आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. आयुक्त अध्यक्ष असलेल्या वृक्षप्राधिकरण समितीच्या मंजुरीने वृक्षलागवडीसाठी निविदा प्रक्रिया राबविली जाईल.
इलेक्ट्रिक बसेससाठी बसडेपो उभारणी- १५ कोटी, सायकल ट्रॅक तयार करणे - १५ कोटी, शहरात २५ ठिकाणी ई-चार्जिंग स्टेशन उभारणे- १० कोटी, मनपाच्या तीन अमरधाममध्ये शवदाहिनी- १० कोटी, मनपाचे जलतरण तलाव तसेच ८५ स्वच्छतागृहांच्या छतावर सोलर रूफटॉप बसविणे- आठ कोटी, चार यांत्रिकी झाडू खरेदी- ११ कोटी ३० लाख, रस्ते दुभाजक तसेच उद्यानांमधील वृक्षलागवड व हिरवळ तयार करणे- आठ कोटी अशी प्रकारची कामे महापालिकेने हाती घेतली आहेत. यातील सायकल ट्रॅक, यांत्रिकी झाडू, शवदाहिनी तसेच सोलर रूफटॉप ही कामे पूर्ण झाली असून, बसडेपो व चार्जिंग स्टेशनची कामे प्रगतिपथावर आहेत.
वृक्षलागवडीच्या माध्यमातून शहरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा केली जाणार आहे. यासाठी उद्यान विभागाच्या प्रस्तावाला पर्यावरण विभागाने निधी उपलब्ध करून दिला असून, आयुक्तांच्या मंजुरीने वृक्षलागवडीची कामे केली जातील.
- विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, महापालिका.