

नाशिक : कोरोना महामारीत लांबणीवर पडलेल्या महापालिकेच्या वैद्यकीय पदव्युत्तर पदवी महाविद्यालयाला अखेर मुहूर्त लागला. नाशिकरोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा प्रस्ताव महापालिकेला प्राप्त झाला आहे. आयुक्तांशी चर्चा करून यासंदर्भातील प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.
नाशिकरोड येथील ठाकरे रुग्णालयात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न महापालिकेचे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. सुरुवातीला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मान्यतेने या रुग्णालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले जाणार होते. परंतु हा प्रकल्प पिंपरी चिंचवड महापालिकेने पळविल्यानंतर नाशिक महापालिकेची कोंडी झाली होती. आयुक्त कैलास जाधव यांच्या कार्यकाळात पुन्हा या प्रस्तावाला चालना दिली गेली. या अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरांना महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अभ्यासक्रमाच्या कालावधीत सेवा देणे बंधनकारक राहणार असल्याने महापालिकेच्या रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या कमतरतेचा प्रश्नही आपोआप मार्गी लागणार आहे. यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे पथक मुंबईत या अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कॉलेज ऑफ फिजिशियन्स ॲण्ड सर्जनला भेट देऊन आले होते. या कॉलेजने बिटकोच्या तपासणीसाठी महापालिकेकडे ९ लाखांचे शुल्क मागितले, तेही भरण्यात आले आहे.
जून २०२१ पासून हे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले होते. परंतु फेब्रुवारी २०२१ पासून नाशिकमध्ये शिरकाव केलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महापालिकेच्या या स्वप्नावर पाणी फेरले. प्रशासकीय मान्यता, कर्मचारी भरती, वसतिगृह व इतर मूलभूत सुविधांबाबतचा प्राथमिक आराखडा महापालिकेने तयार केला असला, तरी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे या आराखड्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे महापालिकेला वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्यालय सुरू करता आले नाही. आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिकेला सादर केला असल्याची माहिती मुख्य आरोग्य-वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी दिली आहे.
आरोग्य विद्यापीठ व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने ठाकरे रुग्णालयात सुरू केल्या जाणाऱ्या वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ७७ एमबीबीएस डॉक्टरांना प्रवेश दिला जाईल. हे एमबीबीएस डॉक्टर महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे वैद्यकीय मनुष्यबळाच्या कमतरतेचा प्रश्न निकाली निघणार आहे.