

नाशिक : विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या घवघवीत यशामुळे विरोधी पक्ष कोमात गेले असताना, भाजपने आतापासूनच महापालिका निवडणुकीची तयारीदेखील सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात सदस्यता नोंदणी अभियान राबविले जात असून, त्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समिती संयोजकपदाची सूत्रे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी नाना शिलेदार यांच्याकडे सोपविली आहेत.
विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. जिल्ह्यातील पाचही जागा राखण्यात भाजप यशस्वी ठरला. त्यात नाशिक शहरातील तीनही जागांचा समावेश आहे. या निवडणुकीतील यशानंतर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आता महापालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. गत निवडणुकीत सर्वाधिक ६६ जागांवर विजय मिळवत महापालिकेची सत्ता एकहाती काबीज करणाऱ्या भाजपने आगामी काळातही महापालिकेत कमळ फुलविण्याची तयारी केली आहे. त्याचाच भाग म्हणून वातावरणनिर्मितीसाठी भाजपतर्फे शहरात सदस्यता नोंदणी अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी सदस्यता नोंदणी अभियान समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या संयोजकपदी शिलेदार यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात शहराध्यक्ष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. ॲड. राहुल ढिकले, माजी आ. बाळासाहेब सानप, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी, भाजप ज्येष्ठ नेते विजय साने, सुनील केदार, ॲड. श्याम बडोदे, हिमगौरी आडके - आहेर, महेश हिरे, प्रदीप पेशकर, नाशिक लोकसभा संयोजक गिरीश पालवे, पवन भगूरकर, चंद्रशेखर पंचाक्षरी, ज्ञानेश्वर काकड, शांताराम घंटे, वसंत उशीर, सुनील देसाई, भगवान काकड, रवींद्र पाटील, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.
या अभियानाच्या माध्यमातून महिनाभरात विधानसभानिहाय ५० हजारांहून अधिक नवीन सदस्यांची नोंदणी केली जाणार आहे. भाजपचे सदस्य होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा.
- प्रशांत जाधव, शहराध्यक्ष, भाजप.
शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर मंडलनिहाय बैठकांचे आयोजन करणार असून, सदस्यता नोंदणी अभियान गतिमान करून भुतो न भविष्यती असा विक्रम आपण या नोंदणी अभियानात करू.
- काशीनाथ शिलेदार, संयोजक सदस्यता नोंदणी अभियान
संयोजक - नाना शिलेदार, सहसंयोजक - रोहिणी नायडू, सुनील केदार, ॲड. श्याम बडोदे, सागर शेलार, सोशल मीडिया प्रतिनिधी - हृषिकेश डापसे.