

नाशिक : महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंत नावे नोंदविलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार १३ लाख ६० हजार ८२१ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांची संख्या वाढणार असल्याने मतदान केंद्रांच्या संख्येतही वाढ होणार आहे. आगामी निवडणुकीसाठी १९४४ मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. यासंदर्भातील अहवाल जिल्हा निवडणूक अधिकारी अर्थात जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जात नाही. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी वापरली जाते. १ जुलै २०२५ पर्यंत नावे नोंदविलेली यादी महापालिका निवडणुकांसाठी वापरली जाईल. त्यानुसार मतदान केंद्रांची संख्या निर्धारीत केली जात आहेत.
२०१७च्या नाशिक महापालिका निवडणुकीत एकूण १०.७३ लाख मतदार होते. ज्यामध्ये ५.७ लाख मतदार पुरूष तर ५.०२ लाख महिला मतदार होत्या. त्यापैकी ६.६ लाख मतदारांनी मतदान केले होते. दि. १ जुलै २०२५ पर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांचा आढावा घेतला असता आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी १३.६० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. २०१७च्या नाशिक महापालिका निवडणुकीत १३४२ मतदान केंद्रे होते. त्यावेळी सुमारे ८०० मतदारांसाठी एक मतदान केंद्र होते. मतदारांची संख्या वाढल्याने आगामी निवडणुकीसाठी मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ होणार आहे. साधारणत: १९४४ मतदान केंद्रे अपेक्षित आहेत. त्याचप्रमाणे या मतदान केंद्रांवर २२०० कंट्रोल युनिट व ४५०० बॅलेट युनिट लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मतदान केंद्रांवर प्रत्येकी पाच याप्रमाणे सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. यासंदर्भातील अहवाल महापालिकेतील निवडणूक कक्षामार्फत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे.